गल्लोगल्ली अडथळ्य़ांमुळे दूध, भाजीपाला, वृत्तपत्र वितरण व्यवस्था कोलमडली

पुणे : करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी शहराच्या ज्या भागात पूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे तेथील संचार तसेच व्यवहारांवर बुधवारपासून कडक निर्बंध (कर्फ्यू) लागू करण्यात आले. पूर्व भागात निर्बंध घालण्यात आल्यानंतर मध्यरात्रीपासून संपूर्ण शहरात बाबूंचे अडथळे बांधण्यात आले. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ तसेच टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता परिसरातील गल्ली बोळात अडथळे उभारण्यात आले. त्यामुळे शहरात पहाटे येणाऱ्या दूध, भाजीपाल्याच्या गाडय़ा दुकानापर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे सामान्यांना दूध तसेच भाजीपाला उपलब्ध झाला नाही तसेच वृत्तपत्रेदेखील मिळाली नाहीत.

शहरातील मध्यभागातील कुमठेकर, टिळक, केळकर, शिवाजी रस्त्यालगतच्या छोटय़ा गल्ली बोळांमध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर बांबूचे अडथळेबांधण्यास सुरुवात केली. कोथरूड, कर्वेनगर भागातील छोटय़ा रस्त्यांवर बांबूचे अडथळे बांधण्यात आले. त्यामुळे पहाटे दुधाच्या गाडय़ा मध्यभागातील अनेक भागात पोहचल्या नाहीत. भाजी वाहतूक करणारे छोटे टेम्पो पोहचले नाहीत. त्यामुळे बुधवारी सकाळी अनेक भागात दूध तसेच भाजीपाला उपलब्ध झाला नाही. काही भागात वृत्तपत्रेदेखील उपलब्ध होऊ शकली नाहीत. पोलिसांनी खडक, स्वारगेट, कोंढवा, फरासखाना या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र,ज्या भागात कडक निर्बंध नाहीत अशा भागातही बांबूने रस्ते बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

महात्मा फुले मंडई परिसरातील भाजी मंडईतील विक्रेत्यांना बुधवारी दुकाने उघडू देण्यात आली नाहीत तसेच काही भागात किराणा माल विक्रेत्यांना दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले. सकाळी दूध, भाजीपाला उपलब्ध न झाल्याने सामान्यांना झळ पोहचली. शहरातील अनेक भागात ज्येष्ठ नागरिक एकटे राहायला आहेत. त्यांना काही खाणावळ व्यावसायिकांकडून घरपोच डबे उपलब्ध करुन देण्यात येतात. मध्यभागातील गल्ली बोळही बंद करण्यात आल्याने त्यांना डबे उपलब्ध झाले नाहीत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे, रुग्णवाहिका देखील पोहोचू शकणार नाहीत.

मूळ उद्देशाला हरताळ, सामान्यांची होरपळ

संचारबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची अजिबात टंचाई भासणार नाही यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. पूर्व भागात कडक निर्बंध घालण्यात आल्यानंतर संपूर्ण शहरात कडक निर्बंध  घालण्यात आले. मध्यभागातील सदाशिव, नारायण, शनिवार पेठेतील प्रमुख रस्ते तसेच शहरातील अन्य भागातील गल्लीबोळात बांबूचे अडथळे उभारण्यात आले. त्यामुळे पहाटे येणाऱ्या दुधाच्या गाडय़ा, किराणा माल आणि बेकरी मालाच्या गाडय़ा व्यावसायिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत.

भाजीपाला विकण्यास मज्जाव

शहरातील पूर्व भागातील गुलटेकडी, डायस प्लॉट, महर्षीनगर, घोरपडे पेठ, मंगळवार पेठ, कागदीपुरा, कोंढवा परिसरात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत करण्याची मुभा देण्यात आली आहे. या भागातील संचारबंदी दोन तास शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले होते. मात्र, ज्या भागात कडक निर्बंध लादण्यात आले होते त्या भागात बुधवारी सकाळी भाजीपाला विक्रेत्यांना भाजी विकण्यास मज्जाव करण्यात आला, तसेच पोलिसांकडून या भागातील दुकानेही बंद करण्यात आली.