शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेने जे २५ टक्के प्रवेश द्यायचे आहेत, ते प्रवेश शाळांकडून दिले जात नसल्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाने या प्रवेशाचे वेळापत्रकच जाहीर केले असून या मोहिमेला मंडळाने सुरुवात केली आहे.
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांनी गुरुवारी ही माहिती दिली. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि मागास घटकातील विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेतील २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या कायद्याचे पालन पुण्यातील शाळांकडून होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषत: इंग्लिश माध्यमाच्या शाळांनी हा कायदा धुडकावला असून हा कायदाच आम्हाला लागू होत नाही, असा दावा इंग्लिश माध्यमाच्या शाळांकडून केला जात आहे. त्यामुळे या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश झालेले नाहीत. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका शिक्षण मंडळाने मोहीम सुरू केली असून त्यासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या प्रवेशासाठी मंडळाने वेळापत्रक जाहीर केले असून त्याची तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी बुधवारी मंडळातर्फे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत प्रवेशासंबंधीची माहिती देण्यात आली. राजीव गांधी ई-लर्निग स्कूलमध्ये ही बैठक पार पडली. या कायद्यानुसार जे प्रवेश द्यायचे आहेत त्यासाठीचे अर्ज शाळांनी ५ जूनपर्यंत उपलब्ध करून द्यायचे आहेत. आलेल्या अर्जाची छाननी १० जूनपर्यंत करायची आहे. त्यानंतर अपात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून त्याबाबत संबंधित पालकांना शाळांनी माहिती द्यायची आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ११ जूनपर्यंत पूर्ण करायची आहे. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांवर या प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली असून शिक्षण मंडळ स्तरावर त्यासाठी नियंत्रण पथकही स्थापन करण्यात येत आहे.