शहराच्या गावठाण भागातील चटईक्षेत्र निर्देशांकाबाबत विकास आराखडय़ात मुद्रणदोष झाल्यामुळे दोन ऐवजी दीड चटईक्षेत्र लागू झाले आहे. या चुकीचा फटका शहरात सुरू असलेल्या शेकडो बांधकामांना बसत असून महापालिकेने चूक करून देखील आता नागरिकांना नोटिस दिल्या जात आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव, नगरसेवक संजय बालगुडे यांनी गुरुवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. विकास आराखडय़ाबरोबर जी विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्या नियमावलीत गावठाण भागात दीड चटईक्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इन्डेक्स- एफएसआय) अनुज्ञेय राहील, असा उल्लेख आला आहे. प्रत्यक्षात, अस्तित्वात असलेला दोन एफएसआय कायम ठेवून तो अडीच करणे आवश्यक होते. तशी मागणीही करण्यात आली होती. एफएसआयचा आकडा दोनऐवजी दीड छापणे ही फार मोठी चूक असून ती निदर्शनास आणून दिल्यानंतर ती दुरुस्त केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. प्रत्यक्षात, चूक दुरुस्त न करता उलट दोन एफएसआय वापरून जी बांधकामे सुरू आहेत, अशा बांधकामांना नोटिस देण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे, असे बालगुडे यांनी सांगितले.
ही चूक प्रशासनाकडून झालेली असल्यामुळे ती तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश आपण द्यावेत, असे पत्र बालगुडे यांनी गुरुवारी आयुक्तांना दिले. जुन्या नियमाप्रमाणेच दोन एफएसआय गावठाणात लागू करावा आणि गावठाण हद्दीत जेथे दोन एफएसआय वापरून बांधकामे सुरू असतील त्यांना नोटिस देऊ नयेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.