शहराच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तब्बल पन्नास टक्के कामांना यंदा कात्री लावण्यात आली असली, तरी पालिकेच्याच निधीतून लाखो रुपये खर्च करून महोत्सव साजरे करण्याचा मात्र निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विकासकामांपेक्षा महोत्सव हाच नगरसेवकांच्या प्राधान्याचा विषय असल्याचेही स्पष्ट झाले असून पुणेकरांच्या पैशांतून नगरसेवकांचा उदोउदो असा प्रकार होणार आहे.
महापालिकेतर्फे कोटय़वधी रुपये खर्च करून अनेक महोत्सवांचे आयोजन यापूर्वी केले जात होते. मात्र, या उधळपट्टीवर जोरदार टीका झाल्यानंतर आणि राज्य शासनानेही या खर्चाना आक्षेप घेतल्यानंतर सर्व महोत्सव रद्द करून दरवर्षी महापालिकेतर्फे चारच महोत्सव भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय आता बदलण्यात आला असून लवकरच आणखी चार महोत्सवांची भर महोत्सवांमध्ये पडणार आहे. या चार महोत्सवांवर तब्बल पन्नास लाख रुपये खर्च होतील. सावित्रीबाई फुले जयंती (३ जानेवारी) ते जागतिक महिला दिन (८ मार्च) या कालावधीत महापालिकेच्या वतीने यूथ फेस्टिव्हल आणि महिला महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुरुषोत्तम करंडकच्या धर्तीवर महापौर करंडक स्पर्धेचे आयोजन करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आलेली विविध विकासकामे यंदा निधीअभावी कमी करण्यात आली आहेत. एलबीटी, बांधकाम विकास शुल्क, मिळकत कर आणि राज्य शासनाकडून येणारे अनुदान अशा उत्पन्नाच्या सर्व खात्यांमध्ये यंदा मोठी घट झाली आहे. अंदाजपत्रकातील कामे सुरू होत नसल्यामुळे नगरसेवकांकडून त्यासाठीही ओरड होत आहे. मात्र ही परिस्थिती असतानाच महोत्सवांसाठी मात्र मोठा खर्च केला जाणार आहे.
यापूर्वी काय झाले होते..?
– यापूर्वीच्या अनेक महोत्सवांमध्ये हितसंबंधीयांचा आर्थिक लाभ कसा होईल, त्यांनाच निविदा कशा मिळतील हे पाहण्यात येत होते. या महोत्सवांमध्ये पक्षीय राजकारणही झाले आणि काही ठेकेदारांनी बेकायदेशीर कामेही केली.
– महापालिकेने यापूर्वी करीअर महोत्सव भरवला होता. मात्र तो वादग्रस्त ठरला होता. या महोत्सवात सर्व कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसवून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली होती. हाच महोत्सव यूथ फेस्टिव्हल या नावाने भरवला जाणार आहे.
– यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या महिला महोत्सवात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्या आमने-सामने आल्या होत्या आणि महिला महोत्सव पक्षीय राजकारण व वादांनीच गाजला होता. त्याबाबत पत्रकबाजीही झाली होती. तोच महोत्सव महिला सक्षमीकरण महोत्सव नावाने भरवला जाणार आहे.
– आतापर्यंत भरवण्यात आलेल्या महोत्सवांमधून फक्त लाखो रुपये खर्च झाले.
विकासकामे पूर्ण झाली का..?
‘‘महोत्सव न भरवण्याचा महापालिकेचाच निर्णय होता. तो याच नगरसेवकांनी घेतला होता. तोच आता रद्द करण्यात आला आहे. मुळात महोत्सव वा नाटय़करंडक स्पर्धा भरवणे हे महापालिकेचे काम नाही; पण इथे तर जणू शहरातील सर्व विकासकामे पूर्ण झाल्यासारखेच निर्णय घेतले जात आहेत. महापालिकेच्या पैशातून नेत्यांची प्रसिद्धीची हौस असा हा प्रकार आहे.’’
– विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच)