पुणे : मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारे साहित्य पुरविणाऱ्या स्मशान फंड कमिटीसारख्या संस्था राज्यात सर्व ठिकाणी गरजेच्या आहेत, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. स्मशान फंड कमिटी ही वास्तवामध्ये सुरक्षा समितीच आहे, असेही ते म्हणाले.  स्मशान फंड कमिटीतर्फे लता मंगेशकर फाउंडेशनच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास रुग्णवाहिका तसेच शिरवळ येथील कमला मेहता नेत्र रुग्णालयास बस भेट देण्यात आली. कमिटीतर्फे श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त आणि वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे वाहनांच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. कमिटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ साने, सुनील नेवरेकर आणि संजय गोखले या वेळी उपस्थित होते. त्यापूर्वी पाटील यांच्या हस्ते वाहनांची पूजा करण्यात आली. 

नवीन रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना उपचारांसाठी मदत होईल, असे सांगून डॉ. धनंजय केळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये रुग्णालयाची माहिती दिली. नवीन बसमुळे दृष्टिहीन रुग्णांना प्रवासासाठी मदत होईल आणि त्यांना लवकर उपचार मिळू शकतील, असे सांगून डॉ. वैजयंती गद्रे यांनी कमला मेहता नेत्र रुग्णालयाची माहिती दिली. पाटील यांच्या हस्ते साने, नेवरेकर, गोखले तसेच सागर कुलकर्णी आणि सतीश गणाचार्य यांचा सत्कार करण्यात आला. अतिदक्षता विभागाचे संचालक डॉ. प्रसाद राजहंस यांनी प्रास्ताविक केले.

या वाहनांचा उपयोग रुग्णालयाकडून गरजू रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी करण्यात येणार आहे. करोना साथीत स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना पीपीई संच दिले होते. पुण्यात प्लेगची साथ असताना मृतदेहांवर रात्री अपरात्री अंत्यविधी करण्यासाठी आणि त्यासाठीचे सामान मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत होती. ही अडचण समजून लोकमान्य टिळकांनी गणेश नारायण साने आणि हरी नारायण आपटे यांच्यामसवेत अंत्यविधीचे सामान एकाच ठिकाणी मिळावे म्हणून स्मशान फंड कमिटी ही चोवीस तास सुरू असणारी संस्था सुरू केली. तेव्हापासून गेली ११० वर्षे संस्थेचे काम सुरू आहे.

बाळ साने, व्यवस्थापकीय विश्वस्त, स्मशान फंड कमिटी