पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक फौजदार संतोष क्षीरसागर यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. श्रीहरी बहिरट हे सध्या गुन्हे शाखेच्या दंगल नियंत्रण पथकामध्ये नियुक्तीस आहेत. बहिरट हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक होते.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड: ऑनलाइन गेमध्ये लाखो रुपये हरला, युट्यूबवरील बुलेट चोरीचे व्हिडिओ पाहून चोरी करायला शिकला, अन..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहिरट यांच्या सांगण्यावरुन फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी सहायक फौजदार क्षीरसागर याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मे २०२४ मध्ये ही घटना घडली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. क्षीरसागर याने तडजोडीत दोन लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविली होती. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा घटनांमुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून श्रीहरी बहिरट आणि क्षीरसागर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत बहिरट यांनी दररोज पोलीस नियंत्रण कक्ष आणि क्षीरसागर यांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हजेरी द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.