लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोथरुड भागात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. उजवी भुसारी कॉलनी परिससरातील एका इमारतीत ही कारवाई करण्यात आली. सट्टेबाजांकडून मोबाइल संच, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

मुकेशकुमार शैलेंद्रकुमार साहू (वय २४), देवेंद्र कमलेशकुमार यादव (वय २१), जसवंत भूषणलाल साहू (वय २२), राहुलकुमार गणेश यादव, रोहितकुमार गणेश यादव (वय २६), दुष्यंत कोमलसिंह सोनकर (वय २३), संदीप राजू मेश्राम (वय २१), अखिलेश रुपाराम ठाकूर (वय २४), मोहम्मद ममनून इस्माइल सौदागर (वय ३२), अमित कैलास शेंडगे (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी साहू, यादव, सोनकर, ठाकूर, मेश्राम मूळचे छत्तीसगडचे आहेत. याबाबत खंडणी विरोधी पथकाचे सहायक फाैजदार प्रवीण ढमाळ यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

कोथरुडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील पटेल टेरेस इमारतीत आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथून लॅपटॉप आणि मोबाइल संच असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील तपास करत आहेत.