लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : बारामतील तालुक्यातील लाटे गावात एका ज्येष्ठ शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी प्रसारित केलेल्या चित्रफितीत पाटबंधारे, महावितरण विभाग, तसेच पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले. शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हनुमंत पांडुरंग सणस ( वय ७०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सणस यांचे भाऊ जयवंत यांनी बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अभिजित उर्फ सोपान घुले, अमर दत्तात्रय दुधाणे (रा. पुणे), मोहन उर्फ बजरंग शंकर कोळेकर, संभाजी महादेव खलाटे, प्रकाश बाबुलाल माने (तिघे रा. लाटे, ता. बारामती) यांच्या विरुद्ध शिवीगाळ, धमकाविणे, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस… जाणून घ्या मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

हनुमंत सणस यांनी २६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री कार्यालयासह उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह पाटबंधारे, महावितरण कार्यालयात निवेदन दिले होते. महावितरणच्या कोऱ्हाळे बुद्रुक शाखा, जलसंपदा विभागाची वडगाव निंबाळकर विभाग, तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून त्रास देण्यात येत असल्याची तक्रार सणस यांनी निवेदनाद्वारे केली होती . बारामती तालुक्यातील लाटे गावतील गट क्रमांक १४१ मध्ये हनुमंत सणस यांचे नीरा नदीजवळ शेती आहे. या क्षेत्रातून अन्य कोणालाही पाणी उचलण्याची परवानागी जलसंपदा विभागाने दिलेले नाही. मात्र, महावितरणने आठ शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली होती. सणस त्यांना त्यांच्या जागेतून ये-जा करण्यास मज्जाव करत होते. त्यामुळे सणस यांना दमबाजी करण्यात आली होती, असे सणस यांचे भाऊ जयवंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी वाचा-पिंपरी : विरोधी उमेदवाराचे आव्हान किती असेल? महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, उमेदवार कोण…!

नदीतून बेकायदा पद्धतीने पाणी उचलणारे आरोपी सणस यांना धमकावत होते. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली हाेती. सणस यांच्या मुलाला धमकाविण्यात आले होते. पाटबंधारे, महावितरण विभाग, तसेच पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कारवाई केली नाही. आरोपी अभिजित उर्फ सोपान घुले, अमर दुधाणे), मोहन कोळेकर, संभाजी महादेव खलाटे, प्रकाश बाबुलाल माने यांनी सणस यांना धमकावले होते. १५ मार्चपर्यंत मला न्याय द्यावा, अशी विनंती सणस यांनी निवेदनाद्वारे केली होती. सणस यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सणस यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine allegation of neglect of government agencies pune print news rbk 25 mrj
First published on: 15-04-2024 at 17:17 IST