शहरात उच्छाद मांडलेल्या सोनसाखळी चोरांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस एकीकडे प्रयत्न करीत असताना रोजच नवनव्या घटना घडत आहेत. मंगळवारी पोलिसांनी एक मोठी कारवाई करीत तीन सोनसाखळी चोरांना पकडले आणि त्यांच्याकडून तब्बल ७४ तोळे सोने जप्त केले.. या कारवाईमुळे शहर पोलीस दल शाबासकी मिळवित असतानाच बुधवारी पुणे व िपपरी- चिंचवडमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या सहा घटना घडल्या. त्यात चोरटय़ांनी सुमारे पाच लाखांहून अधिक  किंमतीचे सोने लंपास केले.
दरम्यान, यापूर्वीच्या काही गुन्ह्य़ात चोरांकडून जप्त करण्यात आलेले दागिने शुक्रवारी नागरिकांना परत केले जाणार आहेत. दागिने चोरीला गेलेल्यांसाठी ही चांगली बातमी असली, तरी सोनसाखळी चोरीचे एक अजबच चक्र शहरात सुरू झाले आहे. त्यामुळे पोलिसांचे प्रयत्नही कमी पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या भरदिवसा हिसकावून नेण्याचे प्रकार शहरात रोजच घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या घटनांना आळा घालण्यासाठी कंबर कसली. नाकाबंदी, वेगवेगळ्या ठिकाणी गस्त आदी प्रकारातून या गुन्ह्य़ातील आरोपी पकडले. मात्र, तरीही सोनसाखळी चोरीचे गुन्हे थांबू शकलेले नाहीत.
मंगळवारी पोलिसांनी सोनसाखळी चोरीतील तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात सोनसाखळी चोरीचे २५ गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून तब्बल ७४ तोळे सोने जप्त करण्यात आले. या कारवाईची माहिती पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. मात्र, याच दिवशी पुन्हा नवे चोरटे शहरामध्ये सोनसाखळी चोरीचे गुन्हे करीत होते. या एकाच दिवशी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकविण्याच्या सहा घटना घडल्या. िपपरी पोलीस ठाण्यांतर्गत तपोवन रस्ता, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये महात्मा फुलेनगर व चिखली, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी, खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाऊ पाटील रस्ता व वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैरोबा नाला या भागांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी रस्त्याने जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून नेले. सोनसाखळी चोरीच्या या अजब चक्रामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांवर वचक बसविला असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत असला, तरी घडणारे नवे गुन्हे पाहता शहर पोलीस दलापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
चोरीचे दागिने परतीचा कार्यक्रम
सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ामध्ये यापूर्वी पकडलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेले दागिने संबंधितास परत करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीने हे दागिने संबंधितांना देण्यात येणार आहेत. दुपारी तीन वाजता  पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime chain snatching police
First published on: 21-08-2015 at 03:25 IST