राजकीय हस्तक्षेप, पोलिसांची ‘हप्तेगिरी’, ‘भाईगिरी’ चे आकर्षण, गुंडांना मिळणारी प्रतिष्ठा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहराला वाढत्या गुन्हेगारीचा विळखा बसला आहे. वाहनांच्या तोडफोडीचे सत्र, चोऱ्या, घरफोडय़ा, हाणामाऱ्या, खून याबरोबरच गेल्या आठवडय़ात झालेल्या गोळीबाराच्या दोन घटना आणि वकिलानेच दिलेली माजी नगरसेवकाच्या खुनाची सुपारी, यामुळे पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडची गुन्हेगारी चर्चेत आली. वाढती लोकसंख्या, पोलिसांची हप्तेगिरी, राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे व त्यांना मिळणारे अर्थपूर्ण संरक्षण, पोलिसांचा नसलेला धाक, राजकीय हस्तक्षेप, ‘भाईगिरी’चे वाढते आकर्षण, गल्लीबोळातील गुंडांना मिळणारी प्रतिष्ठा, अल्पवयीन मुलांचे गुन्ह्य़ातील वाढते प्रमाण असे अनेक घटक या वाढत्या गुन्हेगारीला कारणीभूत आहेत.

पुण्याच्या वाढीला मर्यादा पडू लागल्यानंतर पिंपरी-चिंचवडची जोमाने वाढ होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या जवळपास २० लाखांहून अधिक झाली आहे. वेगाने झालेले नागरीकरण, महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या उच्चतम दर्जाच्या नागरी सुविधा, शांततापूर्ण वातावरण यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये येणाऱ्या नागरिकांचा ओघ वाढला. मात्र, त्याचबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्तींचाही शिरकाव शहरात झाला. एकापाठोपाठ एक अशा अनेक ‘नको त्या’ घटना घडू लागल्याने शहराच्या प्रतिमेला गालबोट लागले आहे.

शहरात वर्षांत ५० खुनाच्या घटना घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. किरकोळ कारणांवरून कोयते आणि तलवारी काढल्या जातात, झुंडीच्या झुंडी रस्त्यावर येतात आणि एखाद्याच्या जिवावर उठतात. वाहनचोऱ्या, घरफोडय़ांचा उच्छाद कायम आहे. बँकेतून काढलेले पैसे सुखरूप नेता येतील की नाही, याची शाश्वती नाही. ज्येष्ठांना लुटण्याचे, महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याचे, पोलीस असल्याची बतावणी करून लुबाडण्याचे उद्योग सुरूच आहेत. १८ ते २५ या वयोगटातील गुन्हेगारांची डोकेदुखी पोलिसांसमोर आहे. गुन्हेगारी विश्वाविषयी असलेले भाईगिरीचे आकर्षण हे गुन्हेगारीमागचे कारण आहे.

गुन्हेगारी वाढली आहे आणि शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज आहे, या दोन्ही विषयाकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही, हेच प्रकर्षांने दिसून येते. गेल्या काही वर्षांतील शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने चढता आहे. लक्ष द्यायला पाहिजे, त्याकडे पोलिसांकडून डोळेझाक केली जाते. राजकीय हस्तक्षेपाचे कारण पोलीस पुढे करतात, मात्र पोलीस आणि राजकारणी यांच्यात साटेलोटे असून दोघेही एकमेकांचा शक्य तितका वापर करून घेतात.

गुन्हेगारीच्या मुद्दय़ावरून पोलीस आणि राजकारण्यांचे एकमेकांकडे बोट दाखवणे म्हणजे नागरिकांची दिशाभूल करणे आहे. पोलीस आयुक्तालयाचे घोंगडे तसेच पडून आहे. पोलिसांची मनोवृत्ती आणि कार्यपद्धती अशीच राहिली तर, शहरात पोलीस आयुक्तालय झाले तरी फरक पडणार नाही.

कुणीही उठतो आणि ‘भाई’ होऊ पाहतो

पिंपरी-चिंचवड आणि वाहनांची तोडफोड हे अतूट समीकरण बनले आहे. ठरावीक कालावधीनंतर तोडफोडीचा ‘उद्योग’ होतोच होतो. गेल्या आठ महिन्यात काळेवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, चिंचवडला वाहनांची तोडफोड झाली. चिंचवड, केशवनगरला मोटारी जाळण्यात आल्या. जुन्या सांगवीत दुचाकी व चारचाकींची तोडफोड  झाली. पिंपळे गुरवला ‘एटीएम’ केंद्र फोडण्यात आले. निगडीत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. लाकडी दांडके, हॉकी स्टीक, बॅट, सिमेंटचे ब्लॉक, लोखंडी रॉडचा वापर करत अशाप्रकारची दहशत केली जाते. हे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. दर वेळी तोडफोड करणारे नवीनच चेहरे पुढे येतात. पोलिसांचा धाक नसल्याने कुणीही उठतो आणि ‘भाई’ व्हायला निघतो, हे वास्तव आहे.

पिंपरी कॅम्प परिसरात साधू वासवानी उद्यानालगत काळेवाडी येथील गुन्हेगार संतोष कुरावत याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दुसऱ्याच दिवशी, भोसरीत गवळी माथा येथे दुचाकीवर आलेल्या दोघांनी हॉटेलचालक विजय घोलप याच्यावर गोळीबार केला. आणि तिसरी घटना म्हणजे, काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाच्या सुपारी प्रकरणाने खळबळ उडाली. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी गुन्हेगारांना ही सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. मंचरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत. त्याआधी काँग्रेसच्या तिकिटावर कदम आणि मंचरकर एकाच पॅनेलमध्ये निवडून आले होते. पुढे त्यांच्यात स्थानिक मुद्दय़ावरून वादविवाद होत गेले. नगरसेविका मंचरकर यांना पिंपरीतील क्षेत्रीय सभेत कदम समर्थकांकडून मारहाण झाल्यानंतर वाद पराकोटीला गेले. आता प्रकरण हाताबाहेर गेले असल्याने खराळवाडीच्या राजकारणात काय होईल, हे सांगता येणार नाही.

सप्टेंबर महिन्यातील गुन्ह्य़ांचा घटनाक्रम

२ सप्टेंबर – वाकड येथे परराज्यातील दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाच वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले.

७ सप्टेंबर – चिंचवडगावात पूर्ववैमनस्यात दोन गटात राडा आणि १७ मोटारी फोडण्यात आल्या.

९ सप्टेंबर – प्रेयसीचा गर्भपात केला नाही म्हणून तिच्या प्रेमवीराने िपपळे गुरवला डॉ. अमोल बिडकर यांच्यावर हल्ला केला.

११ सप्टेंबर – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किवळे येथे ट्रकचालकाला बेदम मारहाण करून लुटण्यात आले.

११ सप्टेंबर – महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा प्रेमाच्या त्रिकोणातून त्याच्या मित्रांनीच खून केला.

११ सप्टेंबर – देहूला दगडाने ठेचून अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या.

१३ सप्टेंबर – घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने तीन वर्षांच्या बालकाला लाकडी पट्टीने बेदम मारहाण केली.

१५ सप्टेंबर – पिंपरी बाजारपेठेत (कॅम्प) एका हॉटेलमध्ये घुसून संतोष कुरावत या गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला.

१५ सप्टेंबर – पिंपरी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले.

१६ सप्टेंबर – भोसरी गवळी माथा येथे आर्थिक देवाण-घेवाणीतून हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal activities rise in pimpri chinchwad city
First published on: 20-09-2017 at 01:34 IST