लोकसाहित्याच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासकांसाठी पर्वणी

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातील डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासारखी अभ्यासदृष्टी नव्या पिढीच्या संशोधकांमध्ये विकसित करून ही वाट प्रशस्त व्हावी, या उद्देशातून डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यादृष्टीने ढेरे यांचा विपुल ग्रंथसंग्रह लोकसाहित्याच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

२१ जुलै हा डॉ. रा. चिं. ढेरे यांचा जन्मदिन. हे औचित्य साधून प्रसिद्ध कवयित्री आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्राच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. केंद्राच्या विश्वस्त मंडळाच्या वर्षां गजेंद्रगडकर, प्रा. सुधीर दप्तरदार, नंदकुमार वाळवेकर, श्रद्धा कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांसह पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे या वेळी उपस्थित होते.

मराठी संतसंस्कृती आणि लोकसंस्कृती, तसेच मराठी भाषा यांच्या अध्ययन-संशोधनाद्वारे भारताच्या सांस्कृतिक वैविध्यातील परस्पर संबंध बळकट व्हावेत, हा या संस्थेच्या स्थापनेमागचा मूलभूत उद्देश असल्याचे सांगून डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या,‘‘या केंद्रामार्फत अण्णांच्या संग्रहातील सुमारे ४० हजार पुस्तकांसह संदर्भग्रंथांचे जतन आणि संवर्धन करून आवश्यक सोयी-सुविधांसह ते अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. युवा संशोधकांना सांस्कृतिक आणि भाषिक अभ्यासासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. संस्कृतीच्या घडणीतील स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने संस्कृतीच्या वाटचालीतील स्त्रियांचे योगदान संस्थेद्वारे अभ्यासले जातील. पर्यावरण आणि संस्कृती यांचे परस्पर संबंध स्पष्ट करून शाश्वत विकासाच्यासंदर्भात अभ्यास केला जाईल.’’

डॉ. ढेरे यांचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह सामावू शकेल अशा प्रशस्त जागेची संस्थेला आवश्यकता आहे. अण्णांचे काम पुढे नेणे हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी संस्थेला विविध प्रकारे मराठी माणसांकडून मदतीची अपेक्षा आहे. संस्थेच्या मुख्य भांडवल निधीला, विविध प्रकल्पांसाठी तसेच ग्रंथालयाच्या देखभालीसाठी अर्थसाहाय्य, ग्रंथालयासाठी आवश्यक फर्निचर, विविध शैक्षणिक साधने, दृक-श्राव्य साधनसामग्री अशा वेगवेगळ्या कारणांसाठी निधीची आवश्यकता आहे. इच्छुकांनी ‘डॉ. आर. सी. ढेरे सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ या नावाने धनादेश काढावेत, असे आवाहन डॉ. अरुणा ढेरे यांनी केले आहे.

संस्कृती-संशोधन केंद्राचे भावी उपक्रम

  • विविध विषयांवरील संशोधन प्रकल्पांचा अभ्यास
  • विविध विद्याशाखांमधील अभ्यासक-विद्वानांची व्याख्याने आणि चर्चासत्रे
  • विविध पुरस्कारांप्रसंगी ढेरे यांनी केलेल्या भाषणांचे जतनीकरण
  • ढेरे यांच्या विविध पुस्तकांचा अन्य भाषांमध्ये अनुवाद
  • दरवर्षी २१ जुलै रोजी ‘समन्वय’ वार्षिकांकाचे प्रकाशन
  • ढेरे यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारा दहा मिनिटांचा माहितीपट आणि एक तासाचा लघुपट

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ‘लज्जागौरी’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास असलेल्या जयंत बापट यांनी केला असून हे पुस्तक आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

– वर्षां गजेंद्रगडकर