सायबेज सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे  सातारा जिल्ह्य़ातील राजेवाडी हे गाव दत्तक घेण्यात आले होते. आता कंपनीने या गावातील प्राथमिक गरजांची पूर्तता करून गावाचा कारभार ग्रामपंचायतीकडे सोपवला आहे.
पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाचा विकास करण्यासाठी सायबेजने गाव दत्तक घेतले होते. गावातील प्राथमिक गरजा पूर्ण करणे, गावकऱ्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांची सामाजिक आणि आर्थिक प्रगती करणे या उद्देशाने कंपनीच्या वतीने ग्रामविकास प्रकल्प हाती घेण्यात आला होता. हा प्रकल्प पूर्ण करून गाव आता ग्रामपंचायतीच्या स्वाधीन करण्यात आले. ‘आरोग्यसंपन्न जीवन जगणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. सायबेजच्या माध्यमातून आम्ही या गावातील परिस्थितीत सुधारणा करू शकलो याचा मला आनंद आहे,’ असे मत कंपनीचे संस्थापक विश्वस्त दीपक नथानी यांनी व्यक्त केले.