माहिती अणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होत असताना राज्यात सायबर गुन्ह्य़ांमध्ये मोठी वाढ होत चालली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात सायबर गुन्ह्य़ात दुपटीने वाढ झाली असून राज्यात सर्वाधिक पुणे शहरात गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.  बदला घेण्यासाठी, पैशाच्या हव्यासापोटी, एखाद्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचविण्यासाठी, छेडछाड या उद्देशाने या प्रकारचे गुन्हे केल्याचे आढळून आले आहे. गुन्हे करणाऱ्यांमध्ये जवळचे मित्र, शेजारी आणि नातेवाईक यांचा सर्वाधिक समावेश असल्याचे समोर आले आहे.
सीआयडीने तयार केलेल्या ‘महाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१३’ या अहवालातून ही बाब समोर आली आहे. राज्यात २०१२ साली राज्यात माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी अॅक्ट) आणि भारतीय दंड संहिता अनुसार ५६१ गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये ४०७ आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये २०१३ साली मोठी वाढ झाली असून या वर्षी राज्यात आयटी अॅक्ट आणि आयपीसी कायद्याअंतर्गत ९०७ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ६०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्यात दाखल होणाऱ्या सायबर गुन्ह्य़ांमध्ये दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक पुणे शहरात आहे. पुणे शहराचा अलिकडे वेगाने विस्तार होत असून आयटी शहर म्हणून ओळख तयार झाली आहे. पुणे पोलिसांकडे आयटी अॅक्टचे गुन्ह्य़ांच्या तपासासाठी स्वतंत्र सायबर सेल सुरू आहे. त्यामुळे पुण्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात पुण्यात आयटी अॅक्टचे शंभर गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी ६१, ठाणे ५२, औरंगाबाद ४७, मुंबई ४० गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे करणारे आरोपी हे १८ ते ३० वयोगटातील सर्वाधिक आहेत. सायबर गुन्ह्य़ांचा कारणांचा शोध घेतला असता त्याची वेगवेगळी कारणे समोर आली आहे. बदला घेण्यासाठी दहा गुन्हे दाखल झाले आहेत. तर, पैशाच्या हव्यासासाठी ८४, एखाद्याच्या लौकिकास हानी पोहचावी म्हणून ३९, अवैध प्राप्तीसाठी फसवणूक करण्यासाठी १४०, छेडछाड आणि छळवणुकीचे ११७ गुन्हे दाखल आहेत. या प्रत्येक कारणाचे गुन्हे पुणे शहरात दाखल आहेत.
सायबर गुन्ह्य़ात संशयितांची माहिती घेतली असता शेजारी, मित्र व नातेवाईक यांची संख्या मोठी असून दाखल गुन्ह्य़ात ७४ आरोपी हे या प्रकारातील असल्याचे आढळून आले आहे. व्यावसायिक स्पर्धक, असंतुष्ट कर्मचारी, परदेशी नागरिक यांचा या गुन्ह्य़ात सहभाग असल्याचे पाहणीत समोर आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber crime police
First published on: 27-11-2014 at 03:30 IST