पुणे : राज्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऱ्याने चाळिशी ओलांडली. उष्म्याने अक्षरश: कहर केला असून, दिवसभर अंगाची लाही लाही करणारे वातावरण सध्या राज्यभरात आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापुरात ४३.७ अंश सेल्सिअस इतकी झाली. पुढील तीन दिवस किनारपट्टीसह राज्यात तापमान वाढण्याचा अंदाज असून, किनारपट्टीला उष्म्यासाठीचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात राजस्थान, गुजरातमधून उष्ण वारे येत आहे. अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी झाले असल्याने उष्म्यात वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर तापमान वाढून उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू शकतात.

हेही वाचा >>>भविष्यात सत्ताधारी निवडणुकाच टाळतील; ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भीती

दरम्यान, राज्यात कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता कमाल तापमान चाळीस अंशांच्या वरच राहिले. विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याने कमाल तापमान त्या मानाने कमी राहिले. नागपूरमध्ये ३७.४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले.

राज्याच्या इतर काही प्रमुख शहरांत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुढीलप्रमाणे, पुणे : ४१.३, अकोला : ४१.३, छत्रपती संभाजीनगर : ४०.७, नांदेड : ४२.४, जळगाव : ४२.२, कोल्हापूर : ४०.२, महाबळेश्वर : ३४.१, सोलापूर : ४३.७, मुंबई : ३४.४, रत्नागिरी : ३४.०.