सायकलींचे शहर ही पुण्याची जुनी ओळख परत मिळवण्यासाठी शहरभर सायकल मार्ग बांधण्याचा घाट महापालिकेकडून घालण्यात आला खरा; पण बांधायचे ठरवलेल्या सायकल मार्गापैकी निम्मेच मार्ग प्रत्यक्षात तयार होऊ शकले. अस्तित्वात असलेल्या सायकल मार्गाच्या निम्म्याहून अधिक भागात अडथळेच असल्यामुळे सायकलींचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासारखी स्थिती कधी निर्माण होणार यावर प्रश्नचिन्हच आहे.
‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’ आणि ‘परिसर’ यांच्यातर्फे पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भात असलेल्या प्रश्नांचा सर्वेक्षणाच्या माध्यमातून धांडोळा घेण्यात आला. याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात २०१२-१३ मधील वाहतुकीची सद्यस्थिती उघड झाली आहे. ‘परिसर’ संस्थेचे प्रकल्प संचालक रणजित गाडगीळ यांनी या सर्वेक्षणाचे निकष व निष्कर्ष याविषयी माहिती दिली.

सायकलचा वापर अत्यल्पच
पुण्याच्या रस्त्यांवरून सायकली गायब झाल्या असल्याचे या सर्वेक्षणाच्या आकडेवारीतही स्पष्ट दिसून येत आहे. झोपडपट्टी वस्तीत राहणाऱ्या नागरिकांबरोबरच लघु, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. शहरात केवळ ६.३ टक्के कुटुंबांकडे सायकल असल्याचे दिसून आले आहे. तब्बल ८१.३ टक्के कुटुंबांची वाहतूक दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर अवलंबून आहे. १२.४ टक्के कुटुंबांकडे सायकल किंवा इतर कोणतेही वाहन नाही, त्यामुळे या कुटुंबांची वाहतुक इतर साधनांवर विसंबून आहे.

सायकली का गायब झाल्या असाव्यात?
सायकलींचा वापर कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सायकल चालवण्यासारखी परिस्थितीच रस्त्यांवर नाही, हेच असल्याचे अहवालाच्या आकडेवारीवरून समोर येते. शहरातील एकूण नियोजित सायकल मार्ग आणि प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले सायकल मार्ग यांचे प्रमाण व्यस्त आहे. बीआरटी कार्यान्वित असलेल्या सर्व रस्त्यांच्या दुतर्फा सायकल मार्ग असणे अपेक्षित आहे. तसेच काही निवडक रस्त्यांवर आधीपासूनच सायकल मार्ग बांधले आहेत. हे सर्व सायकल मार्ग जमेस धरून शहरात किती किलोमीटरचे नियोजित किंवा बांधलेले सायकल मार्ग आहेत हा आकडा काढण्यात आला. त्यानुसार २०१२-१३ मध्ये ११२ किलोमीटरचे सायकल मार्ग पुण्यात असणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्ष फिरून पाहणी केली असता यापैकी केवळ ६१ किलोमीटरचे सायकल मार्ग अस्तित्वात असल्याचे दिसून आले.

प्रवास..? नव्हे अडथळ्यांची शर्यत!
बांधून तयार असलेल्या सायकल मार्गावरून सायकल चालवताच येणार नाही अशी पुरेपूर सोय या मार्गावर आहे. सायकल मार्गाच्या किती भागात अडथळे आहेत हे या सर्वेक्षणात तपासले गेले. यात सायकल मार्गामध्ये येणारे बस थांबे, सलग येणारे विजेचे खांब, सर्रास वाहनतळ म्हणूनच होणारा सायकल मार्गाचा वापर, कायमचे किंवा काही काळासाठीचे अतिक्रमण या निकषांचा विचार करण्यात आला होता. सर्वेक्षणानुसार बांधलेल्या सायकल मार्गाच्या तब्बल ५६ टक्के भागात निव्वळ अडथळेच आहेत.

सायकल मार्ग आहेत; पण अधूनमधून!
रणजीत गाडगीळ यांनी शहरातील कोणते सायकल मार्ग मध्यातूनच ‘गायब’ होतात या विषयीचे चित्र स्पष्ट केले. त्याची काही ठळक उदाहरणे खालीलप्रमाणे-
– गणेशखिंड रस्त्यावर अधूनमधूनच सायकल मार्ग दिसतो. उड्डाणपुलाजवळ तर नाहीच.
– नगर रस्त्यावर बंड गार्डनपासून हयात हॉटेलपर्यंत सायकल मार्ग नाही, पण हयात हॉटेलपासून पुढे सायकल मार्ग आहे.
– सिंहगड रस्त्यावर दांडेकर पूल परिसरात सायकल मार्ग संपतो.
– सिमला ऑफिस चौकापासून संचेती रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर सायकल मार्ग आहे, पण तो एकाच बाजूला आहे.
– जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर कॉलेज ऑफ इंजिनियरिंगपासून पुढे खडकी लष्कर भागाच्या हद्दीपर्यंत सायकल मार्ग बांधलेला असल्याचे लक्षात देखील येत नाही. त्यामुळे त्याचा वापरही होत नाही.
– कर्वे रस्त्यावर पौड फाटय़ाजवळील उड्डाणपुलाजवळ सायकल मार्ग संपतो.