राज्यातील शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम येत्या वर्षांपासून बदलण्यात येणार असून नव्या आराखडय़ानुसार एटीकेटी असावी का, पदविका अभ्यासक्रमातही सेमी इंग्रजी सुरू करावे का, अशा काही मुद्दय़ांवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने अभिप्राय मागवले आहेत. पदविका अभ्यासक्रमाचा नवा आराखडा जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम आता डीएड ऐवजी डीएलएड (डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन) अशा नावाने ओळखला जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून बदलणाऱ्या या अभ्यासक्रमाचा आराखडा परिषदेने जाहीर केला आहे. या आराखडय़ानुसार आता पदविका अभ्यासक्रमासाठीही श्रेयांक पद्धत लागू होणार आहे. नव्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष कामाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता २० आठवडे शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी माहिती तंत्रज्ञान (आयसीटी) हा स्वतंत्र विषय म्हणून शिकवण्यात येत होता. मात्र, नव्या आराखडय़ानुसार हा स्वतंत्र विषय न ठेवता नियमित विषय शिकवताना माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे शिकवण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे चर्चेत असलेले सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन (सीसीई) म्हणजे नेमके काय, त्याचा अवलंब कसा करावा याचा समावेशही अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
डीएलएड करणाऱ्या विद्यार्थ्यांना एटीकेटी असावी का, शाळांची सेमी इंग्रजी माध्यमातील गरज लक्षात घेऊन डीएलएडसाठीही सेमी इंग्रजी सुरू करावे का; कार्यानुभव, कला, शारीरिक शिक्षण या विषयांची परीक्षा महाविद्यालयांच्या स्तरावर न ठेवता ती परिषदेकडून घेण्यात यावी का, अशा काही मुद्दय़ांवर परिषदेने अभिप्राय मागवले आहेत. परिषदेच्या े२ूी१३.१ॠ.्रल्ल या संकेतस्थळावर आराखडा उपलब्ध असून त्यावर अभिप्राय देण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
– ‘आराखडय़ावर आलेल्या सूचना आणि अभिप्रायांची छाननी करून आवश्यक ते बदल करून एप्रिल महिन्यात नवा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर जून महिन्यात नव्या अभ्यासक्रमाबाबत कार्यशाळा घेण्यात येतील आणि जुलैपासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. सध्या राज्यातील विविध भागांमध्ये नव्या अभ्यासक्रम आराखडय़ाची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत.’’
– एन. के. जरग, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D ed syllabus new draft declare
First published on: 11-03-2015 at 03:55 IST