धरणक्षेत्रात तसेच, धरणांच्या लाभक्षेत्रातही पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे पुणे विभागात अभूतपूर्व स्थितीचा सामना करावा लागत आहे. पुण्याची धरणे १५ ऑगस्टच्या आधीच भरून वाहू लागतात. या वेळी मात्र १५ ऑगस्ट तोंडावर आला तरी धरणांचा साठा निम्म्यावरच आहे आणि नजीकच्या भविष्यात फार मोठय़ा पावसाचीही शक्यता नाही. अशी स्थिती पहिल्यांदाच अवतरली असल्याने आता जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील अस्वस्थता वाढू लागली आहे.
पुण्यासाठीची खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही धरणे तसेच, पिंपरी-चिंचवडसाठीचे पवना धरण यांच्या क्षेत्रात विशेष पाऊस पडलेला नाही. आतापर्यंत धरणे भरून वाहतात. मात्र, या धरणांच्या क्षेत्रात सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ४० टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे ही धरणे पूर्ण भरलेली नाहीत. पुण्यासाठीच्या चार धरणांमध्ये एकूण १५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकाच उपयुक्त साठा उपलब्ध आहे. एकूण साठय़ाच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ ५१.५८ इतकी आहे. पवना धरणात ६ टीएमसी पाणी असून, ते ७०.९५ टक्के भरले आहे.
धरणांच्या क्षेत्रात पाणी नाही, तसेच धरणांचे लाभक्षेत्र असलेल्या बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर या तालुक्यांमध्येही पावसाने मोठय़ा काळासाठी उघडीप दिली आहे. या भागात दखल घ्यावा असा पाऊस सलग ५५ दिवस पडलेला नाही. त्यामुळे एकीकडे पाण्याचा साठा कमी आणि पावसाअभावी पाण्याची मागणी जास्त अशी स्थिती उद्भवली आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे, अशी माहिती जलसंपदा खात्याच्या पुणे उपविभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी दिली.

पुण्याच्या धरणांतील पाणीसाठा (साठय़ाचे आकडे टीएमसीमध्ये, पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये
धरण       मंगळवारचा पाऊस        १ जूनपासूनचा पाऊस        उपयुक्त पाणीसाठा        टक्केवारी
खडकवासला        १                ३८२                    ०.४३                ३१.९६
पानशेत            १                ११३७                ७.०३                ६६.०१
वरसगाव            २                ११३३                ६.१७                ४८.१०
टेमघर            ०                १५८८                १.४१                ५१.५८
एकूण                                                १५.०४            ५१.५८
…………
पवना                            १२६४                ६.०४                ७०.९५
……..
पुढे काय?
‘‘सध्या पावसाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. आणखी दहा दिवस वाट पाहणार आहोत. त्यानंतर लाभक्षेत्रात कोणती पिके घ्यायची याबाबत नियोजन करावे लागेल. पावसाने गेली सलग ५५ दिवस हुलकावणी दिली आहे. शेतीच्या पाण्याची मागणी वाढली आहे. पुढे दोन आठवडय़ांत चांगला पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याचीसुद्धा मागणी सुरू होईल.’’
– अतुल कपोले, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dam area monsoon water level
First published on: 12-08-2015 at 03:30 IST