शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरली

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणे १०० टक्के  भरली आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणारे टेमघर धरण १०० टक्के  भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणे १०० टक्के  भरली आहेत. चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्य़ातील अन्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असल्याने अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा के ला जातो. हंगामात प्रथमच २२ जुलै रोजी खडकवासला धरण १०० टक्के  भरले. पानशेत धरण ३ ऑगस्ट, तर वरसगाव धरण १९ ऑगस्ट रोजी १०० टक्के  भरले. खडकवासला धरणसाखळीमधील टेमघर धरण १३ सप्टेंबरला भरल्याने चारही धरणांमधील पाणीसाठा २९.१५ अब्ज घनफू ट (टीएमसी) म्हणजेच १०० टक्के  झाला आहे. दिवसभरात टेमघर धरण परिसरात ४५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रांत प्रत्येकी २७ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात ११ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. चारही धरणे १०० टक्के  भरली असल्याने टेमघर धरणातून ३०० क्युसेक वेगाने, वरसगाव धरणातून २६६५ क्युसेकने, पानशेत धरणातून २६९२ क्युसेकने, तर खडकवासला धरणातून मुठा नदीत सायंकाळी सहा वाजता ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही १०० टक्के  भरले आहे. या धरणातून दिवसभरात २१०० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात आले. जिल्ह्य़ातील अन्य धरणांच्या परिसरातही जोरदार पाऊस सुरू असल्याने बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्य़ाच्या सीमेवरील उजनी धरणात ६७ टक्के  पाणीसाठा जमा झाला आहे.  खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांसह वडज, कळमोडी, चासकमान, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी,  गुंजवणी, निरा देवघर, भाटघर आणि वीर या जिल्ह्य़ातील अन्य धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

विसर्गाचा आढावा

गेल्या वर्षी २६ ऑगस्ट रोजी वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के  भरली होती. टेमघर धरणात तब्बल ३०८९ मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर अखेर हे धरण १ नोव्हेंबर रोजी १०० टक्के  भरले होते. सन २०१९ मध्ये २ सप्टेंबर रोजी वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के  भरली होती. टेमघर धरणात तब्बल ४६०८ मि.मी. पाऊस झाल्यानंतर हे धरण १०० टक्के  भरले होते. सन २०१८ मध्ये १९ ऑगस्ट रोजी वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के  भरली होती. या वर्षी टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही, तर या धरणात ६५.९७ टक्के  एवढाच पाणीसाठा झाला होता. सन २०१७ मध्ये १ सप्टेंबर रोजी वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के  भरली होती. याही वर्षी टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते, तर या धरणात ५५.३३ टक्के  एवढाच पाणीसाठा झाला होता.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dams supplying water city 100 percent full ssh