चौकशीत वाहतुक पोलीस कर्मचारी दोषी..
पिंपरी- चिंचवड: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक वार्डनने वाहतूक पोलीसाच्या सांगण्यावरून बस चालकाकडून पैसे घेतल्याच्या आरोपानंतर पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी संबंधित वाहतूक पोलीस कर्मचारी नवनाथ बडे यांना निलंबित केलं आहे. सोमवारी दुपारी उर्से टोलनाका येथे पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ही घटना घडली होती. सखोल चौकशीनंतर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.
सविस्तर माहिती अशी, उर्से टोलनाका येथे वाहतूक वार्डन ने वाहतूक पोलीस कर्मचारी नवनाथ बडे यांच्या सांगण्यावरून बसचालकाकडून पाचशे रुपये घेतले. घटनेनंतर संतप्त बस चालक आणि नागरिकांनी वार्डन ला बेदम मारहाण केली. वार्डन ला या प्रकरणी विचारणा करण्यात आल्यानंतर बडे यांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचं स्पष्ट झालं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठांनी दखल घेतली. नवनाथ बडे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी नवनाथ बडे हे दोषी आढळले असून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी नवनाथ बडे यांना वार्डनकडून पैशांची वसूल करणे चांगलेच भोवले आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
वार्डन च्या खिशातून नागरिकांनी पाचशे ची नोट काढून दाखवली. वाहतूक पोलीस कर्मचारी नवनाथ बडे यांच्याकडे जाऊन तुम्ही पैसे गोळा करत आहात असा प्रश्न नागरिकांनी विचारला. काही प्रमाणात तिथं गोंधळ सुरू होता. हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. याच दरम्यान काही संतप्त नागरिकांनी वार्डन ला मारहाण केली. नागरिकांच्या प्रश्नावरून वाहतूक पोलीस नवनाथ बडे हे सारवासारव करण्याचा प्रयत्न करत होते. बडे यांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला. साहेबांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याची कबुली अखेर वार्डनने दिली.