पुणे : पुणे महापालिका प्रशासनाच्या निर्णयानुसार शहरातील पाचवी ते आठवीच्या शाळा सोमवारी सुरू करण्यात आल्या. शहरातील एकूण ९५० शाळांपैकी ३९८ शाळाच सुरू झाल्या आहेत.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा जूनमध्ये शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यावर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्या वेळी महापालिकेने ११ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तर नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत झाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र महापालिकेने १ फेब्रुवारीपासून शहरातील पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या पथकाकडून शाळांच्या सुविधांची पाहणी केल्यानंतर वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. शहरात पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या ९५० शाळा आहेत. त्यात महापालिकेच्या अखत्यारितील आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश आहे. त्यातील ४८० शाळांची तपासणी पूर्ण झाली. १ फेब्रुवारीपासून ३९८ शाळातील वर्ग सुरू झाले. त्यामुळे पहिल्या दिवशी सर्व शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. पुढील काही दिवसांत महापालिकेच्या पथकाकडून शाळांची तपासणी मान्यता दिल्यानंतर अन्य शाळांतील पाचवी ते आठवीचे वर्गही पुढील काही दिवसांत सुरू होतील, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये आनंद

शाळा व्यवस्थापनाकडून करोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. जवळपास दहा महिन्यांनी शाळेत येता आल्याने, शिक्षकांची प्रत्यक्ष भेट झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेत येण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. पहिल्या दिवशी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. विद्यार्थी वाहतुकीबाबत निर्णय झाल्यावर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असे मुख्यापकांनी सांगितले.