पुणे : आशिया चषक हॉकी स्पर्धेला सुरुवात होण्यास आता काही आठवडेच शिल्लक राहिले असले, तरी पाकिस्तान संघाच्या सहभागाबाबत संभ्रम कायम आहे. ‘हॉकी इंडिया’चे सचिव भोलानाथ सिंह यांनी स्पर्धेत कोण खेळणार, कोण नाही याचे चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले.

राजगीर, बिहार येथे २९ ऑगस्टपासून खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेतून पाकिस्तान संघाने माघार घेतल्याच्या आणि त्यांच्या जागी बांगलादेशला निमंत्रण दिल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या संदर्भात भोलानाथ यांच्याशी संपर्क साधला असता, अजून काहीच निश्चित नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘‘आम्ही ऑलिम्पिक चळवळीला साजेशी भूमिका घेतली. केंद्र सरकारनेही पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यास मान्यता दिली आहे. मात्र, अजून पाकिस्तानकडून कुठलाच प्रतिसाद आलेला नाही. येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. आम्ही स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज आहोत. सहभागी सर्व संघाचे आदरातिथ्य करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत,’’ असे भोलानाथ म्हणाले.

‘‘पाकिस्तानने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या देशाशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा पाकिस्तानकडून अधिकृतपणे माघार घेतल्याचे जाहीर केले जाईल, तेव्हाच पुढची पावले उचलली जातील. सध्या तरी आम्ही थांबा आणि पाहा, अशी भूमिका घेतली आहे,’’ असेही भोलानाथ यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नसली, तरी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक ताहित झमान यांनी या स्पर्धेवर भाष्य केले आहे. ‘‘आमच्या संघातील खेळाडूंची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही चांगला सराव केला आहे. आम्ही खेळण्यास उत्सुक आहोत. मात्र, अंतिम निर्णय सरकारचा असेल. आम्हाला सरकारच्या आदेशाचे पालन करावे लागेल,’’ असे ताहिर झमान यांनी वृत्तसंस्थेला सांगितले होते.

बांगलादेशबाबतही संभ्रम

पाकिस्तानने आशिया चषक हॉकी स्पर्धेतून माघार घेतली असून त्यांची जागा घेण्यासाठी बांगलादेशशी संपर्क साधण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, बांगलादेश हॉकी संघटनेकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. ‘‘आमचा सहभाग निश्चित नाही. हॉकी इंडिया किंवा आशियाई हॉकी महासंघाकडून अद्याप आमच्याशी या संदर्भात अधिकृत संवाद झालेला नाही,’’ असे बांगलादेश हॉकी महासंघाने म्हटले आहे. त्याच वेळी इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी कमी वेळेत राष्ट्रीय संघाची तयारी करुन घेणेही अवघड असल्याचे बांगलादेश हॉकी संघटनेचे म्हणणे आहे. ———