भारतात अनेक राष्ट्रीय गोष्टी आहेत. भारताकडे राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय खेळ अशा गोष्टी आहेत. त्यामुळे विद्येची देवता असलेल्या गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी अध्यात्मिक गुरू भाईश्री रमेशभाई ओझा यांनी केली आहे. शुक्रवारी भारतीय छात्र संसदेच्या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले.

रमेशभाई ओझं यांच्या हस्ते एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन झाले. यावेळी रमेशभाई ओझा म्हणाले की राष्ट्राच्या नेत्याने सर्वांचे ऐकले पाहिजे. त्याची इंद्रिये हत्तीसारखी असावीत. सर्वांचे म्हणणे ऐकून घेन्यासाठी त्याचे कान मोठे आणि चहूबाजूला लक्ष ठेवण्यासाठी नजर सूक्ष्म असावी. जनतेसाठी कारभार चालवत असलेले शासन हे गणपतीप्रमाणे असावे. त्यामुळे गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. ज्ञानाला उद्यमशीलतेची जोड दिली तर राष्ट्राचा विकास झपाट्याने होईल, असे मतही त्यांनी मांडले.

दरम्यान, या कार्यक्रमात पश्‍चिम बंगालच्या विधानसभेचे सभापती बिमन बॅनर्जी यांना ‘आदर्श विधानसभा अध्यक्ष’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.