राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी; मोसमी वाऱ्यांची समुद्रात विश्रांती

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रापर्यंत प्रगती केलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी (२१ मे) मात्र दोन्ही समुद्रात कोणतीही प्रगती न करता विश्रांती घेतली.

पुणे : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रापर्यंत प्रगती केलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी (२१ मे) मात्र दोन्ही समुद्रात कोणतीही प्रगती न करता विश्रांती घेतली. महाराष्ट्रातही पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी झाला असून, पुढील तीन-चार दिवस कोकण वगळता इतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, देशातील उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांत पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दक्षिणेकडील केरळ आणि तमिळनाडूमध्ये काही भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मोसमी वाऱ्यांची समुद्रात प्रगती सुरू असताना राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, दोन दिवसांच्या तुलनेत पूर्वमोसमी पावसाचा जोर ओसरला आहे.

 महाराष्ट्र, मध्य भारतातील काही भाग वगळता देशातील इतर भागात मात्र सध्या पूर्वमोसमी पाऊस होतो आहे. पश्चिमी प्रक्षोपामुळे येणारे बाष्पयुक्त वारे आणि चक्रीय चक्रवाताचा परिणाम म्हणून देशातील उत्तरेकडील भागात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आदी भागात पाऊस होत असून, २३ मे रोजी या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, चंडीगड, दिल्ली, बिहार, झारखंड आदी राज्यांतही पाऊस आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा आदी राज्यांतही पाऊस आहे. पूर्वोत्तर भागातही पाऊस असून, मेघालयात अतिवृष्टी होते आहे. दक्षिणेकडेही केरळमध्ये मुसळधार पाऊस होत असून, केरळसह तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आदी भागांत पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

  र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांची स्थिती अंदमानात १६ मे रोजी दाखल झालेले मोसमी वारे बंगालच्या उपसागरात एकदिवसाआड प्रगती करीत आहेत. बंगालच्या उपसागरात तो १७, १९ मे रोजी जागेवरच होते. दुसरीकडे १६ ते १९ मे या कालावधीत अरबी समुद्राच्या बाजूने त्यांची प्रगती नव्हती. २० मे रोजी मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला आणि त्याच दिवशी बंगालच्या उपसागरातही प्रगती केली. मात्र, २१ मे रोजी मोसमी वाऱ्यांची कोणत्याही बाजूने प्रगती झाली नाही.

राज्यातील हवामान कोरड

महाराष्ट्रात अनेक भागात गेली दोन-तीन दिवस पूर्वमोसमी पाऊस झाला. सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरडे हवामान निर्माण होत आहे. पुढील तीन दिवस या तीनही विभागांमध्ये मोठय़ा पावसाची शक्यता नाही. या कालावधीत तापमानात किंचित वाढ होऊ शकते. कोकणात मात्र २५ मेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात २५ मेनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Decreased pre monsoon rainfall state seasonal winds rest sea ysh

Next Story
पुणे : जोगत्याचे अपहरण; ताम्हिणी घाटात गोळ्या झाडून खून, संशयावरुन दोघे ताब्यात
फोटो गॅलरी