करोना संसर्गाचा नेझल मायक्रोबायोमवरील परिणामाचा पहिल्यांदाच अभ्यास

पुणे : करोना संसर्गाचा नाकातील जिवाणूंवर (नेझल मायक्रोबायोम) होणाऱ्या परिणामाचा शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच अभ्यास केला आहे. त्यात करोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकातील चांगल्या जिवाणूंचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संसर्ग होऊनही काही व्यक्तींना लक्षणे का दिसत नाहीत, याचा उलगडा या संशोधनातून काही प्रमाणात झाला आहे.

राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था (एनसीसीएस) आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय यांनी करोना संसर्गाचा नाकातील जिवाणूंवर होणाऱ्या परिणामासंदर्भात संयुक्त संशोधन केले. या संशोधनामध्ये अविनाश शर्मा, अभिषेक गुप्ता, डॉ. राजेश कार्यकर्ते, सुवर्णा जोशी, रश्मिता दास, डॉ. योगेश शौचे यांचा सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध मायक्रोब्ज अँड इन्फेक्शन या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनासाठी जैवतंत्रज्ञान विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला.

करोनासंदर्भात अलीकडे केलेल्या संशोधनांमध्ये संसर्गशास्त्र, विषाणुची उत्क्रांती, जनुकीय रचना आदींचा समावेश आहे. मात्र नाकातील जिवाणूंवर करोना संसर्गाचा काय परिणाम होतो या बाबत अभ्यास करण्यात आलेला नाही. आरोग्य, आजार, शरीरशास्त्रामध्ये मायक्रोबायोम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मायक्रोबायोमच्या अनुषंगाने करोना संसर्ग झालेल्या आणि संसर्ग न झालेल्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यात संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या नाकातील चांगले जिवाणू कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्या व्यतिरिक्त विशेष काही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही, असे शास्त्रज्ञ अविनाश शर्मा यांनी सांगितले. या अनुषंगाने आणखी सखोल संशोधनाची आवश्यकता आहे. त्यामुळे या संशोधनाचे पुढील टप्प्यावरील संशोधन सुरू असून, त्यातून वेगळी माहिती हाती येऊ शके ल, असे डॉ. शौचे यांनी नमूद केले.

संशोधनाचे स्वरूप

करोना संसर्गाचा नाकातील जिवाणूंवर परिणामाचा अभ्यासासाठी एकूण ८९ व्यक्तींच्या नाकातील नमुने संकलित करण्यात आले. संकलित के लेल्या नमुन्यांची बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यात ६३ संसर्ग झालेल्या, २६ संसर्ग न झालेल्या समावेश होता. त्यापैकी ५४ पुरुष आणि ३५ महिला होत्या. त्यात १५ वर्षापर्यंतच्या १४ जणांचा, १६ ते ३० वयोगटातील १३, ३१ ते ४६ वयोगटातील ८, ४६ आणि त्या पुढील वयाच्या ११ व्यक्ती होत्या.  सहभागींपैकी ४६ व्यक्ती ११ कुटुंबांतील होत्या. या कु टुंबातील किमान एक व्यक्ती संसर्ग झालेली आणि एक व्यक्ती संसर्ग नसलेली होती. संसर्ग झालेल्यांपैकी ९ व्यक्तींना लक्षणे नव्हती, तर ११ जणांना लक्षणे होती. या व्यक्तींच्या नाकातील नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातून डीएनए वेगळा काढून, जनुकीय क्रमनिर्धारण, जैवमाहितीशास्त्र विश्लेषण करण्यात आले.