निवडणुकीतल्या दारुण पराभवामुळे काँग्रेसला प्रचंड धक्का बसला आहे. सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात कमी जागा अशी केविलवाणी अवस्था राज्यात काँग्रेसची झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत पदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास पुण्यात विरोध प्रदर्शन करण्यात येईल, असा इशारा पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या तडाख्यामुळे देशभरात काँग्रेसची वाताहत झाली असून महाराष्ट्रही यातून सुटू शकलेले नाही. राज्यातून काँग्रेसचे अवघे दोनच खासदार निवडून आले आहेत. राज्यातील या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि युवा काँग्रसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला. यानंतर पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. याबैठकीत थेट मुख्यमंत्र्यांविरोधात पक्षाच्या नेत्यांनीच आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणी दीपक मानकर यांनी केली. याबैठकीला विश्वजीत कदमही उपस्थित होते.