कृषी पदवी (बीएस्सी-अॅग्री) अभ्यासक्रमाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, सध्याच्या ११,५०० जागांच्या तुलनेत तब्बल ३२ हजार अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे दिवसेंदिवस ही मागणी वाढतच आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजय कोलते यांनी ही माहिती दिली. व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमबीए, एमएमएस) आणि अभियांत्रिकी विषयाच्या अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. या पाश्र्वभूमीवर कृषी अभ्यासक्रमाची मागणी वाढत असून, या अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. बीएस्सी-अॅग्रीला प्रवेश करणाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षांमध्ये २३ हजारांवरून ३२ हजारांवर पोहोचली आहे. ही वाढ तब्बल नऊ हजारांची आहे. त्या तुलनेत या अभासक्रमाच्या राज्यातील जागा मात्र केवळ दोन हजारांनी वाढल्या आहेत. त्या ९५०० वरून ११५०० अशा वाढल्या आहेत. हा अलीकडचा आकडा आहे. गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये तर ही वाढ लक्षणीय दिसून येत आहे. राज्यात २००५-०६ मध्ये बीएस्सी-अॅग्री या अभ्यासक्रमासाठी ६५०० जागा होत्या आणि त्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नऊ हजार होती. तिथपासून आतापर्यंत जागांमध्ये पाच हजारांची वाढ झाली आहे, तर हा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र तेवीस हजारांनी वाढून ती ३२,००० वर गेली आहे.
कृषी पदवीधरांना उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी, अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया, अभ्यासक्रमाचे शुल्क कमी असणे आणि त्यातही विविध गटांना सरकारकडून मिळणारी सवलत या गोष्टींमुळे ही मागणी वाढली आहे. विद्यार्थ्यांची मागणी वाढली असली तरी या अभ्याक्रमाच्या जागा सरकारकडून वाढवून मिळत नाहीत. त्यामुळे विद्यापीठांनाच जागा वाढवायला सांगितल्या आहेत. त्यामुळे कमी प्राध्यापक व कमी सुविधांमध्ये जास्त विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे, असे कोलते यांनी सांगितले.

विनाअनुदानित महाविद्यालयांना परवानगी
राज्यात कृषी पदवीबरोबरच पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमाच्या (एम.एस्सी-अॅग्री) जागाही कमी आहेत. राज्यात १८०० ते १९०० जागांची गरज असताना प्रत्यक्षात १२६४ जागा आहेत. त्यामुळे एम.एस्सी-अॅग्री अभ्यासक्रम चालवणाऱ्या विनाअनुदानित महाविद्यालयांना पुढील वर्षांपासून मान्यता देण्यात येणार आहे, असे कोलते यांनी सांगितले.