डेंग्यू तापावर पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटय़ूट’तर्फे तयार होणाऱ्या लशीचा पहिला टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर असून अजून दोन महिन्यांत ही लस तयार होऊ शकेल. असे असले तरी या लशीला प्रत्यक्ष बाजारात येण्यासाठी वैद्यकीय चाचण्यांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करावा लागणार आहे. येत्या चार वर्षांत ही लस प्रत्यक्ष वापरासाठी बाजारात येऊ शकेल, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी दिली.
जगात आणखीही काही कंपन्या डेंग्यूच्या लशीवर काम करत आहेत, मात्र अद्याप यातली कोणतीही लस बाजारात उपलब्ध नाही. डेंग्यूच्या विषाणूचे ‘डेंग्यू १’ ते ‘डेंग्यू ४’ असे चार सेरोटाईप्स (प्रकार) असतात. जगात ठिकठिकाणी होणाऱ्या डेंग्यूच्या साथींमध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा डेंग्यू सेरोटाईप आघाडीवर (प्रीव्हेलंट) असल्यामुळे या चारही सेरोटाईप्सच्या विरुद्ध लढा देणारी लस तयार करणे हे या लशीसमोरचे आव्हान आहे.
‘सीरम’तर्फे सध्या ‘लाईव्ह अॅटिनेव्हेटेड व्हॅक्सिन’ या प्रकारची डेंग्यू लस बनवली जात आहे. या तंत्रज्ञानात डेंग्यूच्या विषाणूला विशिष्ट पद्धतीने निरुपद्रवी बनवले जाते. असा निरुपद्रवी बनवलेला विषाणू शरीरात टोचल्यावर शरीर डेंग्यू तापाचा संसर्ग झाल्याचे समजून विषाणूला प्रतिरोध तयार करते. थायलंडच्या माहीडॉल विद्यापीठाने या संकल्पनेवर आधारित डेंग्यूच्या चारही स्ट्रेन्सचे निरुपद्रवी विषाणू तयार केले आणि त्यांच्या प्राण्यांवर केल्या गेलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या. सीरम इन्स्टिटय़ूटने माहीडॉल विद्यापीठाशी गतवर्षी करार केला असून त्याअंतर्गत या विद्यापीठाकडून ‘सीरम’ला हे चारही डेंग्यू स्ट्रेन्स मिळाले आहेत. ‘लाईव्ह अॅटेनिव्हेटेड’ प्रकारच्या लशीत विषाणू जिवंत स्वरुपात असून तो शरीरात जाऊन वाढतो; त्यामुळे या लशीचा डोस कमी द्यावा लागतो. ‘या लशीच्या निर्मितीचा पहिला टप्पा संपत आला असून त्यातून ‘कँडिडेट व्हॅक्सिन’ तयार होण्याच्या मार्गावर आहे,’ असे डॉ. ढेरे यांनी सांगितले.
येत्या दोन महिन्यांत डेंग्यूची ही लस तयार होणार असली तरी लशीचा त्यापुढचा प्रवास मोठा आहे. डॉ. ढेरे म्हणाले, ‘लस आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित व स्थिर असण्याबरोबरच ती नागरिकांना परवडणे गरजेचे असते. पुढच्या चार वर्षांत अशा प्रकारची चारही डेंग्यू सेरोटाईप्सविरुद्ध काम करणारी लस सीरमतर्फे बाजारात येऊ शकेल. लस तयार झाल्यानंतर विविध तापमानांमध्ये तिची स्थिरता कशी आहे हे तपासले जाते. प्रशोगशाळेतील चाचण्या झाल्यावर प्राण्यांवरील आणि नंतर माणसांवरील चाचण्यांची परवानगी घेऊन त्या कराव्या लागतात. शिवाय डेंग्यूच्या लशीची चाचणी केवळ भारतात घेऊन चालणार नाही. जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डेंग्यू सेरोटाईप्सच्या विरोधात या चाचण्या कराव्या लागतील. ही वैद्यकीय चाचण्यांची प्रक्रिया मोठी आहे.’ या व्यतिरिक्त ‘सॅनोफी’ कंपनी व अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ यांच्यातर्फेही डेंग्यू लस तयार केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘सीरम इन्स्टिटय़ूट’ची डेंग्यू लस तयार होण्याच्या मार्गावर – वैद्यकीय चाचण्यांसाठी मात्र दीर्घ प्रतीक्षा
डेंग्यू तापावर पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटय़ूट’तर्फे तयार होणाऱ्या लशीचा पहिला टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर असून येत्या चार वर्षांत ही लस प्रत्यक्ष वापरासाठी बाजारात येऊ शकेल.

First published on: 10-07-2015 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue vaxin by serum inst