सांगली : वाढत्या तापमानाने वितळलेल्या डांबरामध्ये अडकलेल्या घोणस जातीच्या विषारी सर्पाला ‘ॲनिमल राहत’ आणि अन्य प्राणिमित्रांकडून जीवदान देऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. इजा न होता सर्पाला डांबरामधून मुक्त करण्यासाठी चार तासांचा अवधी लागला.
सांगलीमधील कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीजवळ रस्त्याकडेला रस्ता दुरुस्त करून झाल्यावर निष्काळजीपणे टाकलेल्या डांबरामध्ये एक साप अडकल्याची माहिती जागरूक नागरिकांनी प्राणिमित्र मंदार शिंपी, राकेश तळेकर यांना कळवली. प्राणिमित्रांनी तत्काळ जागेवर जाऊन पाहणी केली असता, घोणस जातीचा अत्यंत विषारी साप त्याच्या तोंडापासून ते शेपटीपर्यन्त संपूर्ण डांबरामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला हालचालही करता येणे अशक्य झाले होते.
प्राणिमित्र शिंपी यांनी, सापाला काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या सापाची तोंडापासून ते शेपटीपर्यंतची पोटाकडेची संपूर्ण बाजूच डांबरात अडकलेली असल्याने त्याला त्यातून सहज काढणे अशक्य झाले. म्हणून त्यांनी मदतीसाठी ‘ॲनिमल राहत’मध्ये कार्यरत असलेल्या प्राणिमित्र कौस्तुभ पोळ यांच्याशी संपर्क केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. घोणस साप अत्यंत विषारी असल्याने त्या परिस्थितीतून तसेच वाचवणे अशक्य असल्याने काही वेळासाठी बेशुद्ध करण्यासाठी त्याला भूल देण्याचे ठरले. ॲनिमल राहतचे पशुवैद्यक राकेश चितोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला बेशुद्ध केले गेले आणि मग त्याला डांबरातून सुखरूप बाहेर काढण्याची धडपड सुरू झाली.
डांबरातून सापाला वेगळे करणे अत्यंत अवघड होते. त्यात साप विषारी असल्यामुळे त्याच्या जबड्यातील विषारी दातांपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली. डांबर आणि साप वेगवेगळे करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करण्यात आला. सलग तीन तास प्रयत्न केल्यानंतर सापाला सुखरूप आणि कोणतीही इजा न करता वाचवण्यात यश आले. घोणस सापाला गरजेनुसार उपचार, विश्रांती देऊन शुद्धीत आल्यावर तो व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले.