गुंड गजा मारणे, गुंड नीलेश घायवळ, शरद मोहोळ या टोळ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी शरद मोहोळ टोळीतील सात गुंडांना पुणे शहर व जिल्ह्य़ातून एक वर्षांसाठी तडीपार केले आहे.
गुंड गजा मारणे टोळीलादेखील तपीपार केले होते. पण, या टोळीने मंत्रालयातून तडीपारी रद्द करून आणली होती. त्यानंतर घायवळ-मोरणे टोळीत वाद पेटला. यामध्ये घायवळ टोळीतील दोन गुंडाचा खून झाला. मारणे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याची (मोक्का) कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. तर, घायवळ टोळीतील गुंडांना तडीपार करण्याचे आदेश दिले. गुंड शरद मोहोळ याला सध्या तळोजा कारागृहात खुनाच्या आरोपामध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर टोळी तयार करून खून, जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणे, जबरी चोरी, अपहरण करणे, मारहाण करून गंभीर दुखापत करणे, पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी गोळा करणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीतील सात जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त तांबडे यांच्याकडे आला होता. त्यानुसार मोहोळ टोळीतील सात जणांस एक वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश तांबडे यांनी काढले.
तडीपार केलेल्या गुंडांची नावे पुढीलप्रमाणे: विकास प्रभाकर पायगुडे (वय ३५, रा. केळेवाडी, पौड रस्ता), हेमंत पांडुरंग दाबेकर (वय ३०, रा. सुतारदरा, कोथरूड), पप्पू गणपत उत्तेकर (वय ३०, रा. मुठा, ता. मुळशी), विष्णू तुकाराम कडू (वय ३०, रा. नऱ्हे आंबेगाव, मूळ- मालेगाव, मुळशी), बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय ३५, रा. गणेशनगर, एरंडवणा), नीलेश महादेव खाडे (वय २१, रा. केळेवाडी, पौड फाटा) आणि हरिश्चंद्र उर्फ हरिष विष्णू मोरे (वय २७, रा. सुतारदरा, कोथरूड).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deport to sharad mohol gang criminal in pune district
First published on: 26-04-2015 at 02:20 IST