पिंपरी : ‘उद्योग, कामगारनगरी आता सांस्कृतिकनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख झाली आहे. शहरात अनेक कलावंत, लेखक, कवी, साहित्यिक घडले आहेत. त्यामुळे या शहरात आता नाट्यसंकुल उभारले जाईल.’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्यांचा पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड येथे सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संघटनेचे मुंबईचे विश्वस्त अशोक हांडे, अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ नाट्य संगीतकार ज्ञानेश पेंढारकर यांना कै. बालगंधर्व पुरस्कार, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांना आचार्य प्र.के. अत्रे, अभिनेते, लेखक प्रवीण तरडे यांना कै. अरुण सरनाईक, अभिनेत्री स्पृहा जोशी यांना कै. स्मिता पाटील आणि नाट्य-सिने-मालिका लेखक अरविंद जगताप यांना कै. जयवंत दळवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक सुरेश साखवळकर यांचा नाट्य परिषद, मध्यवर्तीचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.

‘शहरात नाट्यचळवळ रुजत आहे. नाट्य परिषदेतर्फे वर्षेभर एकांकिका, बालनाट्य, प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यासाठी शहरात नाट्यसंकुल उभारावे अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पवार म्हणाले, ‘भाऊसाहेब भोईर यांनी सोमवारी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना भेटावे. जागेबाबत चर्चा करावी. शहरात जागा उपलब्ध करून दिली जाईल. नाट्यसंकुलाच्या मागणीला मूर्त स्वरूप आणले जाईल,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. शेतात काम करून मी पुढे आलो आहे. आजही शेतात काम करतो’, असेही ते म्हणाले.

काम करणाऱ्याला प्रभाग रचनेचा फरक पडत नाही

भौगोलिक सलगतेनुसार प्रभाग रचना तयार केली आहे. मतदारांशी संपर्क, बोलणे, चालणे व्यवस्थित असेल तर कोणत्याही पद्धतीने प्रभाग रचना झाली तरी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी मतदार उभा राहतो. त्यामध्ये फार विचार करण्याची गरज नाही. प्रभाग रचनेबाबत विरोधाभास दिसत असेल तर हरकत घेता येईल, असे पवार म्हणाले.

मत चोरीच्या आरोपातून खोटे कथानक

विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही. मत चोरीच्या आरोपात काही तथ्य नाही. खोटे कथानक पसरविण्याचा प्रयत्न आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब, तेलंगणा या राज्यात विरोधकांची सत्ता आहे. तिथे मतदारयादी, मतदान यंत्रे चांगली होती, त्यावेळी का बोलले नाहीत. मते वाढली नाहीत, चोरी झाली नाही. पराभव मान्य केला पाहिजे, असेही ते म्हणाले.