उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(शनिवार) पुण्यात माध्यमांशी बोलताना, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. याशिवाय त्यांनी विविध मुद्य्यांवरील भूमिका देखील स्पष्ट केली.

“राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे.” अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. यावर फडणवीसांना प्रतिक्रिया विचारली असता, “अजित पवारांना खूप वेळ आहे, ते असे सगळे आरोप करत राहतील. त्याची उत्तर द्यायला मला थोडीच वेळ आहे, मला खूप कामं आहेत.” अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

नाना पटोलेंच्या टीकेवर प्रतिक्रिया –

भय आणि भ्रष्टाचाराच्या जोरावर भाजपा लोकशाही विकत घेत आहे आणि विकण्याची प्रक्रिया राबवत आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे. यावर फडणवीसांनी, “नाना पटोलेंना असे झटके येत असतात. त्यामुळे ते असे काही काही बोलत असतात.” अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.

अशा विरोधकांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही –

तर, शिंदे -फडणवीस अस्तित्वात आल्यापासून प्रस्ताव स्थगिती सुरू आहेत आणि १३८ उद्योग एमआयडीसी मध्येच अडकले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी “विरोधकांना कुठलीही माहिती नाही. कुठलीही माहिती न घेता ते बोलतात त्यामुळे ज्यांना माहिती नाही , अशा विरोधकांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही.” असं विधान केलं.

जलयुक्त शिवार योजने संदर्भाती चौकशा आपण बंद करणार का? –

“जिथे गडबड आहे अशी कुठलीही चौकशी बंद होणार नाही. पण जिथे गडबड नाही पण जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या चौकशी केली असेल, तर अशा चौकशा केल्या जाणार नाहीत.” असं म्हणत फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.
याशिवाय बदल्यांच्या संदर्भात फडणवीस म्हणाले की, “योग्य वेळी बदल्या होतील. मागील वेळच्या बदल्या या सप्टेंबरमध्ये झालेल्या आहेत. जे बदलीपात्र आहेत त्यांच्या बदल्या या सप्टेंबरनतरच होणार आहेत.”

पाहा व्हिडीओ –

नांदेड येथे पोलीस भरतीची मागणी करत तरुणांकडून फडणवीसांसमोर घोषणाबाजी आणि धक्काबुकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याची देखील माहिती आहे. त्याबद्दल फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, “कुठेही धक्काबुक्की, लाठीचार्ज झालेला नाही. पोलीस भरतीची मागणी ते करत होते. मी त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की, आम्ही करणार आहोत. त्यानंतर मी तिथून निघालो.”