पिंपरी : पिंपरी पालिकेची गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा शड्डू ठोकले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय बळ स्थानिक नेत्यांच्या पाठीशी आहेच, प्रशासक राजेश पाटील एकप्रकारे राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरणनिर्मिती करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षातील गटबाजी, विस्कळीत कारभार, नव्या जुन्यांचा संघर्ष अशी काही कारणे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवणारी आहेत.

शुक्रवारी (१० जून) राष्ट्रवादीचा वर्धापनदिन आहे. त्याचे औचित्य साधून शहर राष्ट्रवादीने भरगच्च उपक्रमांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून पालिका निवडणुकांसाठी वातावरणनिर्मिती करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.राष्ट्रवादीकडे २००२ ते २०१७ अशी १५ वर्षे पालिकेची सत्ता होती. या काळात राष्ट्रवादीने शहरात मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलला. तरीही शहरवासीयांनी राष्ट्रवादीला नाकारले आणि भाजपकडे पालिकेचा कारभार दिला, याची सल अजित पवारांच्या मनात आजही आहे. विकासाच्या नावाखाली पालिकेत प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप तेव्हा राष्ट्रवादीवर झाला. याच मुद्दय़ाचे भांडवल विरोधकांनी केले. परिणामी, २०१७ च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभव स्वीकारावा लागला. स्थानिक नेत्यांनी केलेल्या गैरकारभारांचा तो परिणाम होता, असे मानले जाते. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी अजितदादांसह स्थानिक नेत्यांनी व्यूहरचना केली आहे. राज्यातील सत्तेचा आणि पालिकेतील प्रशासकीय राजवटीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला होत आहे.

महपालिकेचे अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्रवादीला झुकते माप ठेवून घेतले जात असल्याची ओरड होत आहे. प्रभागरचना, आरक्षण राष्ट्रवादीला अनुकूल असल्याचे खुद्द राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते. भाजपने घेतलेल्या अनेक लोकप्रिय निर्णयांना आयुक्तांकडून खोडा घातला जात आहे, असा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. असे असतानाही राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांची गटबाजी कायम आहे.

ठरावीक नेत्यांकडे पक्षाची सर्व सूत्रे आहेत. ते इतरांना जुमानत नाहीत. राष्ट्रवादीच्या काही धंदेवाईक नेत्यांचे, प्रतिस्पर्धी भाजपशी आर्थिक साटेलोटे आहे. त्यामुळे ते भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतनाहीत, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीच तक्रार आहे. उमेदवारीच्या आशेने बाहेरून पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यातून नव्या-जुन्यांच्या संघर्षांची स्पष्ट चिन्हे आहेत. पक्षाच्या कामकाजात गेल्या अनेक वर्षांपासून विस्कळीतपणा आहे. पक्षात अलीकडेच खांदेपालट झाली असली, तरी अजूनही जुन्या पद्धतीनेच कारभार सुरू असल्याचे सांगण्यात येते.

पालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे. पक्षात कोणत्याही प्रकारचा विस्कळीतपणा तथा गटबाजी नाही. संघटनात्मक बांधणी चांगली आहे. नव्या-जुन्यांचा मेळ घालून तसेच सर्वाशी जुळवून घेत पक्षाचे काम सुरू आहे. उमेदवारांच्या चाचपणीसाठी सर्वेक्षण सुरू आहे. निवडून येण्याची क्षमता हा महत्त्वाचा निकष असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार शहरातील घडामोडींकडे वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत. पालिकेची सत्ता पुन्हा राष्ट्रवादीकडे येईल, या दृष्टीने व्यूहरचना केली जात आहे.– अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस