मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप, शिवसेना युती सरकारला येत्या ३१ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होते आहे. सत्तेत सहभागी असले, तरी तुझे माझे जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना, अशी भाजप, शिवसेनेची सध्या अवस्था आहे. दोन्ही पक्षांतील कुरबुरी आता रोजच्याच झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारची पुढील वाटचाल कशी असेल, याबद्दल अंदाज व्यक्त केला आहे पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक देवदत्त पाठक यांनी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारने वर्षभर कुरबुरीत संसार केला आणि तडजोडीत तो पार पडला. ३१ ऑक्टोबर २०१४ च्या (चंद्र + लग्न सत्ताग्रहण) कुंडलीवरून मकर रास, मीन लग्न याप्रमाणे विचार केल्यास कर्केच्या गुरूच्या शुभ दृष्टीमुळे सरकार वर्षभर टिकले. परंतु, सध्या बदललेल्या सिंहेच्या गुरुच्या दृष्टीने काही खळबळजनक घटना घडूनही सरकार पुढचे नऊ महिने तरी टिकेल. कारण दुसरे वर्ष मेष राशीचे असल्याने व त्यावर सध्याच्या सिंहस्थ गुरूच्या नवव्या शुभदृष्टीमुळे सरकार कुरबुर करतच कसेबसे टिकेल. महाराष्ट्राची रास मिथून असल्याने त्याच्या राशीच्या लाभात गुरू असल्याने ९ महिने गुरू बदल होईपर्यंत तरी भाजप + शिवसेना युती टिकून राहिल. सहकारी पक्षांच्या स्थानातील राहूचा गुप्त कारस्थानांच्या पद्धतीने चालणार त्रास सत्ताधारी भाजपला सहन करावा लागेल. प्रसंगी अटीतटीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. सध्याच्या राहूची अशुभ बारावी दृष्टी (गोचर) सध्याच्या गुरुवर पडत असल्याने योग्य मार्गदर्शन व समन्वयात गैरसमज राहतील. सत्ताधारींची धोरणे योग्य राहतील पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकारी पक्षच ताणाताणी करत राहील.
सरकार चालवण्याचे पाठबळ हे योग्य संख्येवर अवलंबून असल्याने येत्या एप्रिल महिन्यात त्यासाठी अटीतटीची शर्थ करावी लागेल. कार्यक्षेत्र (दशम) स्थानातील मंगळ हा गुरुमुळे नियंत्रित असल्याने सध्याच्या सरकारला काहीवेळा अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन, करारीबाणा दाखवत असहकार्याच्या संकटांना तोंड द्यावे लागेल.
महाराष्ट्राच्या कुंडलीतले मुळचे राहू, केतू आणि सध्याचे राहू केतू हे एकसारखेच असल्याने विरोधकांनी कितीही धुमाकूळ घातला तरी ३१ ऑक्टोबरच्या आत्ताच्या सरकारच्या कुंडलीवरून गुरुबळ लाभल्याने कितीही खटाटोप झाला तरी सरकार येते वर्षभर तरी सहकार्याविनाही कार्य करेल. सध्याच्या (गोचर) दशमस्थानातील मंगळावर सध्याच्या सिंहस्थ गुरुची शुभदृष्टी असल्याने सत्तासंघर्ष करतच प्रसंगी कटू निर्णय घेऊन सत्ता टिकवली जाईल. सध्याच्या पत्रिकेतील सप्तम स्थानातील कन्येचे बुध, राहू युतीमुळे यांच्या घरचीच माणसं असंतुष्ट राहिल्याने व कुटुंबप्रमुख (मुख्यमंत्री) यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी कर्केचा गुरू पुरेसा आहे. व बदललेला सिंहेचा गुरू खरे कोण, खोटे कोण याचे ज्ञान मुख्यमंत्र्यांना देणार आहे. घरची माणसे ही प्रसंगी अडचणीत आणतील, विरोधकही त्याचा फायदा उठवतील पण मूळचा गुरू आणि सध्याचा सिंहेचा गुरू यामुळे भाजप + शिवसेनेला महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कुरबुरी करत, संघर्ष सहन करत सरकारला येत्या कन्येच्या गुरू बदलापर्यंत म्हणजे अजून ९ महिने तरी धोका नाही.
– देवदत्त पाठक
(नक्षत्र ज्योतिष अभ्यासक)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devdatta pathak predicts future of bjp shivsena led govt in maharashtra
First published on: 28-10-2015 at 01:15 IST