पिंपरी पालिका शिक्षण मंडळातील आठ सदस्यांनी एकजूट दाखवत बंडखोरीचा पवित्रा घेतल्यानंतर सत्तारूढ राष्ट्रवादीने त्यांच्यापुढे शरणागती पत्करल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. या गटातील सदस्य व विलास लांडे समर्थक धनंजय भालेकर यांना सभापतिपदाची उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने ‘झाकली मूठ’ तशीच ठेवली. तर, राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे काँग्रेसच्या श्याम आगरवाल यांना उपसभापतिपदाची ‘लॉटरी’ लागली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून शिक्षण मंडळातील पूर्वीचा बहुमतातील राष्ट्रवादीचा गट अल्पमतात गेला आहे. १३ सदस्यांमध्ये आमदार लक्ष्मण जगतापांचे चार व लांडे समर्थक दोन सदस्य आहेत. त्यांना काँग्रेसच्या दोन सदस्यांचे पाठबळ आहे. स्थानिक नेत्यांच्या कारभारामुळे वैतागलेल्या या सदस्यांनी एकजूट ठेवल्याचे फलित त्यांना मिळाले. दोन्ही निवडणुका बिनविरोध पार पडल्या. मात्र, तरीही निष्ठावान कार्यकर्त्यांस संधी दिल्याचे सांगत राष्ट्रवादीने आपलीच पाठ थोपटून घेतली आहे. गटबाजीमुळे पराभूत झालेले लांडे पक्षनेतृत्वावर नाराज असून राष्ट्रवादीपासून चार हात दूर आहेत. लांडे समर्थकास उमेदवारी देण्यास त्यांच्या विरोधकांचा आक्षेप होता. जगताप भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या समर्थकांना उमेदवारी मिळणारच नव्हती. राष्ट्रवादीत बंडखोरी होत असल्यास बंडखोरांना साथ द्या, अशी भूमिका काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी घेतली. त्यामुळे बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या या गटाला डावलल्यास राष्ट्रवादीचा पराभव निश्चित होता. त्यामुळे भलते धाडस न दाखवता त्याच गटात दोन्ही उमेदवाऱ्या देण्याची सुरक्षित खेळी राष्ट्रवादीने केली.
स्थायी समिती सभागृहात भालेकर व आगरवालांचा महापौर शकुंतला धराडे व पक्षनेत्या मंगला कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी विलास लांडे झिंदाबादच्या जोरजोरात घोषणा दिल्या. अजितदादांमुळे पक्षाशी निष्ठावान कार्यकर्त्यांला संधी मिळाल्याचे सांगत शहराध्यक्ष योगेश बहल यांनी, दादांचा व राष्ट्रवादीचा जयघोष करा, असे बजावले. मात्र, त्यांचे कोणीही ऐकले नाही. लांडे यांचाच जयघोष कार्यकर्ते करत राहिले. भालेकरांनी लांडे, जगतापांमुळे पद मिळाल्याचे सांगत अजितदादांचेही ऋण व्यक्त केले. तर, आगरवाल यांनी सर्वाचे आभार मानून विष्णूपंत नेवाळे यांची मेहनत कामाला आल्याचे नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2015 रोजी प्रकाशित
शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर; उपसभापती श्याम आगरवाल
धनंजय भालेकर यांना सभापतिपदाची उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने ‘झाकली मूठ’ तशीच ठेवली. तर, काँग्रेसच्या श्याम आगरवाल यांना उपसभापतिपदाची ‘लॉटरी’ लागली.

First published on: 24-03-2015 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay bhalekar and shyam agarwal elected