हडपसर येथील तरुणाच्या खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाई याच्यासह तिघांना प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी पी. डी. झांबरे यांनी एक दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या खून प्रकरणी आतापर्यंत २१ जणांस अटक केली आहे. तर, याच गुन्ह्य़ात दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अभिषेक ऊर्फ बंटी सयाजी चव्हाण (वय २८) आणि महेश मारुती खोत (वय २४, दोघेही रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्या इतर दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यानंतर हडपसरमधील बनकर वस्तीमध्ये काही तरुणांनी मोहसीन सादीक शेख (वय २८, रा. बनकर कॉलनी, हडपसर, मूळ- सोलापूर) या तरुणाचा खून केला होता. यामध्ये अठरा जणांस अटक केली होती. या खुनाच्या गुन्ह्य़ात देसाईचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर मंगळवारी न्यायालयाचा आदेश घेऊन त्याला अटक करण्यात आली. देसाईसह तिघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. देसाई हा हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक असून पश्चिम महाराष्ट्रात त्याच्या शाखा आहेत. त्याने १९ जानेवारी रोजी मांजरी बुद्रुक येथे प्रक्षोभक भाषण केले होते. त्या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच बरोबर मार्च महिन्यात धार्मिक तेढ निर्माण करणारी पत्रके वाटली आहेत. या गुन्ह्य़ातील इतर आरोपींनी देसाईने केलेल्या गुन्ह्य़ांपासून प्रेरित होऊन हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद पाटील यांनी केला. न्यायालयाने देसाईसह तिघांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.
‘हिंदू राष्ट्र सेनेवर बंदीचा प्रस्ताव लवकरच पाठविणार’
हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पुणे पोलीस लवकरच राज्य शासनाकडे पाठविणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिली. हडपसर येथील मोहसीन शेख या तरुणाच्या खूनप्रकरणात देसाईला अटक केल्यानंतर हा प्रस्ताव तयार करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. देसाईच्या विरुद्ध २३ गुन्हे दाखल आहेत. शेख याच्या खुनानंतर पुण्यात निर्माण झालेला तणाव आता पूर्णपणे निवळला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2014 रोजी प्रकाशित
धनंजय देसाई याच्यासह तिघांना पोलीस कोठडी
हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाई याच्यासह तिघांना प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी पी. डी. झांबरे यांनी एक दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
First published on: 12-06-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay desai hindu rashtra sena crime court