ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींची स्तुती केली. तसेच, वाढत्या महागाईवरून पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांना देखील त्यांनी सुनावलं. महागाई काय मोदींनी वाढवली आहे का ? असा सवाल विक्रम गोखले यांनी केला.

ब्राह्मण महासंघाच्यावतीने ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना विविध मुद्द्य्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक तर केलंच, शिवाय शिवसेना भाजपा एकत्र आली तर बरं होईल, असंही बोलून दाखवलं.

“जे लोक पक्षाचं काम करतात त्याबद्दल मी त्यांना काही बोलत नाही. पक्षाचं काम सगळेच करतात. पण मोदी जेव्हा देशासाठी उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. मोदी जेव्हा पक्षासाठी काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजून उभा राहत नाही. महागाई काय मोदींनी वाढवली आहे का ? एका बॅरेलची किती किंमत झाली आहे तुम्हाला माहिती आहे का ? तुम्हाला हॉटेलमध्ये एका वेळी १० हजार रुपये खर्च करु शकता पण एक व्यक्ती देशात गेल्या ७० वर्षांपासून जी घाण साचली आहे ती साफ करत आहे, त्याला काही काळ का होईना मदत करता येत नाही?” असं विक्रम गोखले यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंकडून समर्थन; म्हणाले…

तर, राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती आणि भाजपा- शिवसेना युतीबाबत बोलाताना विक्रम गोखले म्हणाले, “ज्या कारणासाठी बाळासाहेबांनी आपला देह ठेवला. बाळासाहेबांनी ज्यासाठी आपली शिवसेना स्थापन केली. ज्या मराठी माणसाला एक आधार वाटला. त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील? याची कल्पना फक्त जे आता बाहेर राहून केवळ बघत आहेत, त्यांनाच येऊ शकते. त्यातला मी एक आहे. माझी सख्खी आत्येसासू ही बाळासाहेबांच्या महिला आघाडीची पहिली शिवसेना प्रमुख होती. बाळासाहेब माझे स्वतःचे मामे सासरे. तेव्हा बाळासाहेबांची भाषण ऐकूण महाराष्ट्र ४० वर्षे तृप्त झालेला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकारणातील जे खेळ सुरू आहेत. ते इतक्या विचित्र स्तरावर पोहचलेले आहेत, की त्यामध्ये मराठी माणूस असो किंवा आता महाराष्ट्रपुरते बोलायचे तर महाराष्ट्रातील माणूस हा भरडला जातोय. लोक अस्वस्थ आहेत, तुम्हाला कल्पना नाही. प्रसारमाध्यमांना फारशी कल्पना नसते. आमच्या सारखी माणसं फिरत असतात, सर्व क्षेत्रातील लोकांचा आमचा संपर्क येतो. त्या प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की हे सगळं गणित चुकलेलं आहे. परंतु हे गणित सुधारायचं असेल तर अजुनही वेळ गेलेली नाही. ”

“ लोकांची फसवणूक करु नका, अन्यथा एक दिवस…. ” ; विक्रम गोखलेंचा शिवसेना-भाजपाला सूचक इशारा!

तसेच, “ ज्या संकटाच्या कड्यावरती आता आपला देश उभा आहे, त्यातून त्याला मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र आलंचं पाहिजे, अशी माझी श्रद्धा आहे. माझे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीसांना मी प्रत्यक्ष प्रश्न विचारलेला होता की, तुमचं त्याने काय बिघडलं असतं? जर अडीच वर्षे त्यांना दिली असती. तुम्हाल कुठली हवी होती पहिली की नंतरची अडच वर्षे? हे माझे त्यांना प्रश्न आहेत. मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. कारण, मी फाडफाड बोलणार माणूस आहे. मी वरचे आदेश वैगरे सगळं झुगारून देतो. त्यांच्या दोघांत जे काही झालं असेल ते त्यांनी जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे, लोकांना फसवून नका तुम्ही. लोक केव्हा तरी मग प्रचंड शिक्षा करतात आणि ती आता आपण भोगत आहोत.” असं विक्रम गोखले यांनी यावेळी बोलून दाखवलं.