दत्ता जाधव, लोकसत्ता
पुणे : राज्यात आजघडीला शेतकऱ्यांकडून गायीच्या दुधाची खरेदी आणि विक्री यामधील तफावत १९ रुपयांची असून, त्याचा कोणताही फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही मिळत नाही. त्यामुळे वितरकांना मिळणाऱ्या प्रचंड कमिशनमध्ये कपात करण्याची आवश्यकता दुग्ध व्यवसायातील धुरिणांनी व्यक्त केली आहे. दुधाची खरेदी सरासरी ३३ रुपये लीटर दराने होते. तेच दूध ग्राहकांच्या हातात येईपर्यंत त्याची किंमत ५२ रुपये प्रति लीटर होते. तब्बल १९ रुपयांची ही दरवाढ ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याने, खरेदी-विक्रीच्या या व्यवहारात शेतकरी आणि ग्राहक या दोघांचीही लूट होत आहे.
शेतकऱ्यांकडून गायीचे दूध ३३ रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले जाते. दूध संकलन, प्रक्रिया, कामगार, वीज, आर्थिक गुंतवणुकीसाठीच्या कर्जाचा हप्ता, व्याज, प्लास्टिकची पिशवी, वितरणासाठीची वाहतूक आदी सर्व खर्च १० ते १२ रुपये धरला तर एकूण ४३-४५ रुपये दराने दूध डेअरीतून बाहेर पडते. त्यात २ रुपये डेअरीचा नफा धरला तर मुख्य वितरकाला दुधाची खरेदी ४७ रुपयांनी करावी लागते. त्या किमतीत त्याचा २ रुपये आणि किरकोळ वितरकाचा ३ रुपये नफा याची भर पडते. असे एकूण ५ रुपये धरले तर गायीचे दूध प्रती लिटर ५२ रुपयांवर जाते.
काही छोटय़ा आकाराचे दूध संघ आपल्या दुधाची विक्री व्हावी आणि बाजारातील आपला ‘ब्रॅण्ड’ टिकून राहावा म्हणून मुख्य वितरकाला दूध ४० ते ४२ रुपयांपर्यंतच देतात. मुख्य वितरकाचे कमिशन अधिक असल्याने त्यांची पिशवीतून होणारी विक्री तोटय़ात आहे. मोठे ब्रँण्ड फक्त ३ ते ४ रुपयांचा फरक ठेवून मुख्य वितरकाला ४८ ते ४९ रुपयाने देतात, अशी वस्तुस्थिती आहे. खरेदीदर वाढल्याने पिशवीतून दूध विक्री करणारे लहान डेअरीवाले अडचणीत आलेले आहेत. त्यांना जर पुढील काळात आपले व्यवसाय टिकवायचे असतील तर पुढील विक्री व्यवस्थेत बदल करावे लागणार आहेत.
मुख्य वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांना मिळणाऱ्या नफ्यात कपात केली, तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदा होणार आहे. अन्यथा पुढील काळात पुन्हा किरकोळ विक्री दरात वाढ करावी लागेल. आज एखादा अपवाद वगळता सर्वाचीच विक्री ५२ रुपयाने होत आहे. साधारणपणे नामवंत ब्रॅण्ड डीलर ते विक्री किंमत यातील फरक ३ ते ४ रुपयांपर्यंत ठेवतात. पण राज्यातील काही छोटय़ा डेअरींकडून हा फरक १० ते १२ रुपयांपर्यंत ठेवला जात आहे. मुख्य वितरक ते ग्राहक म्हणजेच किरकोळ विक्री किमतीतील हे अवाजवी अंतर हीच मोठी अडचणीची बाब आहे. – प्रकाश कुतवळ, अध्यक्ष, ऊर्जा दूध