शिक्षण विभागाची आणि शहराची आठवडय़ाची सुरुवात झाली ती कोंडीने! शिक्षक, कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील संघटना यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने करून शिक्षण विभागाला कोंडीत पकडले, तर साधारण एकाच वेळी झालेल्या तीन स्वतंत्र आंदोलनांमुळे शहराने सकाळी वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने नवी पेठेतील शिक्षक भवनपासून शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या राज्यव्यापी मोर्चात शेकडो शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. शिक्षण संचालक कार्यालयापासून सेनापती बापट रस्त्यावरील शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यत हा मोर्चा होता. सकाळी ११.३० ते १२ च्या दरम्यान शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी सेनापती बापट रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्याचवेळी नवी पेठेतील शिक्षक भवन येथे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीसाठी समाजवादी अध्यापक सभेने रास्ता रोको आंदोलन केले, तर राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीनेही आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यामुळे या भागातही काही वेळ वाहतूक कोंडी झाली. अधिवेशनाच्या तोंडावर शिक्षण क्षेत्रातील सगळ्याच संघटना आक्रमक झाल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारीही कोंडीत अडकले. आंदोलकांना तोंड देतच अधिकाऱ्यांचा आठवडा सुरू झाला.
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने शिक्षकांना अतिरिक्त ठरविणारा २८ ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मोर्चा काढला. या मोर्चात साधारण पाचशे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी अनुदान, भरती, कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्या, मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या, शालाबाह्य़ विद्यार्थी अशा विषयांवर तब्बल १०८ मागण्या करण्यात आल्या. अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती शासनातर्फे करण्याच्या प्रस्तावाला आणि क्रीडा व कला विषयांसाठी अतिथी शिक्षक घेण्याच्या निर्णयाला आंदोलकांनी विरोध केला आहे. या मोर्चात समितीचे अध्यक्ष विजय नवल पाटील, संपर्क प्रमुख शिवाजी खांडेकर आदीही सहभागी झाले होते. यावेळी शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन शासनाला पाठवण्याचे आश्वासन डॉ. भापकर यांनी आंदोलकांना दिले.
समाजवादी अध्यापक सभेने शिक्षण हक्क कायद्यातील त्रुटींबाबत आंदोलन केले. मुलांना पूर्वप्राथमिक वर्गपासून ते बारावीपर्यंत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क असावा, कायदा मोडणाऱ्या शाळांच्या व्यवस्थापकांना तुरूंगवासाती व दंडाची शिक्षा असावी, शिक्षण हक्क कायद्याबाबत येणाऱ्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी अशा मागण्या या आंदोलनामध्ये करण्यात आल्या. अनुदानासाठी पात्र ठरवलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ.भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. अनुदानास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृति समितीने एक दिवसाचे ठिय्या आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास १५ डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.