‘‘बौद्धिक क्षमतेबद्दलचा अप्रामाणिकपणा ही देशातील भ्रष्टाचारापेक्षाही मोठी समस्या आहे आणि त्यामुळे लोकशाहीऐवजी आपण पाखंडीपणाकडे झुकतो आहोत,’’ असे मत ब्लॅकस्टोन इंडियाचे कार्यकारी संचालक रिचर्ड साल्डान्हा यांनी शनिवारी व्यक्त केले. ज्ञानेश्वर मुळे एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टुवर्ड्स लाइट’ या व्याख्यानमालेमध्ये साल्डान्हा बोलत होते.
या वेळी आइसरिट्झचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मोनिष दर्डा, ज्ञानेश्वर मुळे एज्युकेशन ट्रस्टचे संचालक कुलभूषण दुर्नाळे उपस्थित होते. या वेळी ‘लीडरशिप इन अॅक्शन’ या विषयावर साल्डान्हा यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. साल्डान्हा म्हणाले, ‘‘बौद्धिक नेतृत्वासाठी फक्त बौद्धिक क्षमता पुरेशी नाही, तर बौद्धिक क्षमतेबाबत प्रामाणिक असणेही आवश्यक आहे. बौद्धिक पातळीवरील अप्रामाणिकपणा ही मोठी समस्या आहे. किंबहुना ते सर्व समस्यांचे मूळ आहे. बौद्धिक प्रामाणिकपणाअभावी आपण लोकशाहीकडून पाखंडीपणाकडे जात आहोत. सांस्कृतिक बदल, सामाजिक बदल यांची जाण असणे आणि त्या बदलांना सामावून घेणेही चांगल्या नेत्याला जमणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:भोवतीच्या भिंती मोडून काढल्या पाहिजेत.
बदल हा घडणारच, पण तो चांगला घडवायचा की वाईट हे आपल्या हातात असते. चांगल्या बदलांसाठी आपल्याला चांगल्या नेत्याची गरज आहे. पण लोकांच्या क्षमतेप्रमाणेच त्यांना नेता मिळतो हे लक्षात ठेवले पाहिजे.’’
मोनिष दर्डा म्हणाले, ‘‘नेत्याकडे तीन गोष्टी असणे आवश्यक आहे. घडते आहे त्यात बदल होणे आवश्यक आहे याची जाणीव होणे, त्यावर बदल कसा घडवता येईल हे लक्षात येणे आणि बदल प्रत्यक्षात उतरवण्याचे धाडस असणे. बदल घडतच असतो आणि त्याची जाणीव झाल्यानंतर त्यातूनच नेतृत्व उभे राहते.’’