दापोडी येथील विनियार्ड चर्चमध्ये शिरून एका सुरक्षारक्षकासह दोघांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वैयक्तिक वादातून हा प्रकार झाला.
प्रितेश गुरुचरण कांबळे (वय १७, रा. गवळीनगर, भोसरी) व मोहनकुमार नटराजन, अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी रोमिओ लोबो (पूर्ण नाव, पत्ता नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हा या चर्चमध्ये सुरक्षारक्षक असून, नटराजन हा तेथील कर्मचारी आहे. रविवारी रात्री लोबो व इतर काही जण दुचाकीवरून चर्चजवळ आले. चर्चमध्ये असलेल्या सुमो गाडीची चावी देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, त्यास प्रितेश व नटराजन यांनी नकार दिला. याच कारणावरून लोबो याने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने दोघांच्या पोटावर वार केले. त्यानंतर तो फरार झाला. गंभीर जखमी झाल्याने दोघांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.