एका छोटेखानी मैफलीत स्वत: तबला वाजवणारे विलासराव.. कवयित्री शांता शेळके यांच्याशी खास गप्पा मारायला आलेले विलासराव.. कर्वे रस्त्यावरील कट्टय़ावर येऊन गप्पांमध्ये रंगलेले विलासराव.. सांस्कृतिक क्षेत्राला न्याय देणारा मंत्री, सहृदयी आणि उमदा माणूस आणि ज्यांच्यामुळे पदे मोठी झाली असे विलासराव.. विलासराव देशमुख यांच्या अशा आठवणी जागवत विलासरावांचे स्मरण शनिवारी केले जात होते आणि नंतर गीतरामायणाच्या कार्यक्रमाने या शब्दमैफलीला सुरांचीही साथ लाभली.
राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील मंत्रिपद भूषवलेल्या विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने शनिवारी ज्येष्ठ गायक, संगीतकार श्रीधर फडके, कवयित्री, लेखिका डॉ. अरुणा ढेरे आणि निवदेक, सूत्रसंचालक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांना ‘कलागौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या निमित्ताने या तिघांनी आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार, तसेच ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवर यांनी विलासरावांच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे आणि मित्रमंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मोहन जोशी, बाबा धुमाळ, अॅड. शशिकांत पागे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
विलासराव उत्तम रसिक आणि संगीताचे जाणकार होते. गायक सुरेश वाडकर यांचा एक दिवस मला निरोप आला की आज घरी ये. मैफल आहे. म्हणून त्यांच्या घरी गेलो तर मी, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती आणि विलासराव असे चौघेच होतो. त्या दिवशी आमची चौघांचीच मैफल रंगली आणि त्या मैफलीत विलासरावांनी तबला वाजवला होता.. अशी आठवण यावेळी सांगितली श्रीधर फडके यांनी. मंत्रिपदाची सारी झूल बाजूला ठेवून विलासराव शांता शेळके यांच्याशी फक्त गप्पा मारण्यासाठी कसे आले होते आणि दोन तास गप्पा कशा रंगल्या होत्या त्याची आठवण अरुणा ढेरे यांनी या वेळी सांगितली. पुण्यातल्या मित्रांशी गप्पा मारायला विलासराव कर्वे रस्त्यावरील अनिल याच्या पानाच्या दुकानाजवळ जमणाऱ्या कट्टय़ावर कसे आले होते आणि त्या रात्री गप्पा कशा रंगल्या होत्या याची आठवण सुधीर गाडगीळ यांनी या वेळी ऐकवली. ज्यांच्यामुळे पदे मोठी होतात ती माणसे खरी मोठी असतात. विलासरावांनी जी जी पदे भूषविली ती पदे मोठी झाली, असे द्वादशीवार म्हणाले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रमोद रानडे आणि दयानंद घोटकर यांनी गीतरामायणाचा कार्यक्रम सादर करून उपस्थित रसिकांकडून दाद मिळवली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of kalagaurav awards
First published on: 24-05-2015 at 03:25 IST