दिवाळी हा सर्वानी मिळून साजरा करण्याचा सण आहे, याची प्रचिती यंदाच्या दिवाळीत अनेकविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना येणार असून विविध संस्था, संघटनांतर्फे पाचशेहून अधिक सामाजिक उपक्रम यंदाच्या दिवाळीत शहरात होणार आहेत.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते दिवाळी आनंद आणि उत्साहात साजरी करू शकतात; पण ज्यांची अशी स्थिती नाही किंवा काही ना काही कारणांनी ज्यांना दिवाळीचा आनंद मिळू शकत नाही, अशांची दिवाळी आनंददायी करण्याचे महत्त्वाचे काम पुण्यातील अनेक सामाजिक संस्था यंदाही करणार आहेत. संस्था, संघटनांबरोबरच राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, तसेच नगरसेवक मंडळींकडूनही आपापल्या भागात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून याच आठवडय़ात अशा उपक्रमांना सुरुवात होईल.
सीमेवरील जवानांना शुभेच्छापत्र आणि मिठाई पाठवणे, अपंगांनी तयार केलेल्या पणत्या, तसेच अन्य वस्तूंचे प्रदर्शन, सामूहिक वसुबारस, मिठाईच्या कारखान्यांना उपेक्षित बालकांची भेट, रास्त दरातील दिवाळी फराळाची विक्री, अनाथाश्रमातील बालकांची बाजारपेठेत फेरी आणि त्यांच्या आवडत्या वस्तूंची मनमुराद खरेदी, उपेक्षितांच्या संस्थांना दिवाळीनिमित्त भेट व कपडे, फराळ आदींचे वाटप, रास्त दरात फराळासाठीच्या किराणा मालाची विक्री असे कार्यक्रम विविध संस्थांनी चालू आठवडय़ात आयोजित केले आहेत. एखाद्या किल्ल्याची भव्य प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम विविध मंडळांकडून सुरू झाला आहे. तसा तो यंदाही होईल.
प्रत्यक्ष दिवाळीला सुरुवात झाल्यानंतरही भरगच्च कार्यक्रम पुण्यात होतील. त्यात मुख्यत: दिवाळी पहाट, पाडवा पहाट अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. यातील अनेक कार्यक्रम नि:शुल्क आहेत. या उपक्रमांबरोबरच महापालिका आणि विविध संस्थांतर्फे किल्ला बनवणे स्पर्धा, ऐतिहासिक वास्तू सुशोभित करून अशा वास्तूंमध्ये तसेच जुन्या वाडय़ांमध्ये दीपोत्सव, उपेक्षितांसाठी फराळ संकलन, रंगावली प्रदर्शन, अपंगांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, दिवाळी अंकांची प्रदर्शने, जवानांसाठी भाऊबीज हे आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
आनंद लुटणे आणि वाटणे..
दिवाळी म्हणजे आनंद लुटणे आणि आनंद वाटणे. पुण्यातील शेकडो संस्था विविध प्रकारच्या कल्पक उपक्रमांमधून दिवाळीचा आनंद दरवर्षी वाटतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये अशा उपक्रमांचे प्रमाण खूप वाढले आहे. हे सुचिन्ह आहे. सीमेवरच्या जवानांपासून ते निराधारांपर्यंत ज्या ज्या घटकांना दिवाळीत सम्मिलीत करून घेता येईल त्या त्या सर्वासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि त्यातूनच सामूहिक दिवाळी ही संकल्पना अधिक समृद्ध होत आहे.
आनंद सराफ, संस्थापक, विधायक आणि सैनिक मित्र परिवार