दिवाळी-दसऱ्याच्या तोंडावर महागाईचे चटके

तूरडाळ आयातीचा निर्णय घेऊनही आयातीला झालेला उशीर अशा अनेक कारणांनी तूरडाळीने विक्रमी दर गाठला आहे

दसरा दोन दिवसांवर आणि दिवाळी तोंडावर आलेली असताना जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने सुरू असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यच काय; पण सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांना महागाईचे चटके बसू लागले आहेत. डाळींचे दर तर सातत्याने वाढत आहेतच आणि डाळींसह इतर वस्तूंच्या दरातील वाढीमुळे दिवाळीतील फराळाचे तयार पदार्थही यंदा महागणार आहेत. फराळाच्या तयार पदार्थाची पुणे ही मोठी बाजारपेठ असली, तरी या बाजारपेठेलाही यंदा महागाईची झळ बसणार आहे.
दसरा-दिवाळीचा हंगाम सुरू झाल्यामुळे सध्या बाजारात ग्राहकांची गर्दी अपेक्षित असली, तरी भाववाढीचा तीव्र फटका ग्राहकांना बसल्याचे सर्वत्र जाणवत आहे. सणासुदीच्या या हंगामात पुण्यातील बाजारपेठांमध्ये आणि ग्राहकांमध्येही फक्त भाववाढीचीच चर्चा आहे. तूरडाळीने यंदाच्या हंगामात दराचा उच्चांक गाठल्यामुळे तर डाळींच्या भाववाढीची चर्चाच सर्वत्र आहे. गेल्या वर्षीचे घटलेले उत्पादन, यंदाची दुष्काळी परिस्थिती, साठेबाजांनी केलेला साठा तसेच केंद्राने तूरडाळ आयातीचा निर्णय घेऊनही आयातीला झालेला उशीर अशा अनेक कारणांनी तूरडाळीने विक्रमी दर गाठला आहे.
मूग डाळ आणि अन्य डाळींचेही उत्पादन कमी झाल्यामुळे त्यांच्याही दरात वाढ सुरू आहे. हरभरा डाळीच्या दरवाढीमुळे बेसनच्याही दरात वाढ होत आहे. दिवाळीतील अनेक पदार्थ हे बेसनापासून बनवले जात असल्यामुळे त्या पदार्थाचेही दर यंदा वाढणार आहेत. डाळींच्या या दरवाढीबरोबरच सणासुदीची मागणी वाढली की बहुतेक वस्तूंच्या दरात थोडी का होईना वाढ होतेच. तशा प्रकारे साखर, रवा, मैदा, तेल, गोटा खोबरे आदींच्या दरातही वाढ होत आहे. सर्व वस्तूंच्या दरातील या वाढीमुळे सणाचा हंगाम असूनही बाजारपेठांमध्ये तेजी नसल्याचा अनुभव आहे.
तूरडाळीच्या दरात शंभर टक्के वाढ
गेल्यावर्षीच्या दिवाळीत गुलटेकडी येथील घाऊक बाजारात तूरडाळ आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल या दराने मिळत होती. यंदा हा दर २० हजार रुपये क्विंटल असा आहे. तूरडाळीच्या दरात शंभर टक्के वाढ झाली असल्यामुळे किरकोळ बाजारातही तूरडाळ प्रतिकिलो २२० रुपये या दराने विकली जात आहे.
मोठय़ा भाववाढीचे अनेक परिणाम
डाळींची मोठी भाववाढ होत असल्यामुळे यंदाच्या दसरा-दिवाळी हंगामात बाजारपेठेत याचीच चर्चा राहणार आहे. हरभरा डाळीसह सर्वच डाळींचे दर वाढत आहेत. हरभरा डाळीच्या दरवाढीमुळे बेसनाचेही दर वाढत आहेत. हरभरा डाळीच्या या दरवाढीमुळे स्वाभााविकच चकली, कडबोळी, शेव, बेसन लाडू, बुंदी लाडू, मोतीचूर लाडू आदी दिवाळीच्या ज्या ज्या फराळात बेसनपीठ वापरावे लागते, त्या सर्व मालाचेही दर वाढणार आहेत.
प्रवीण चोरबेले, अध्यक्ष, दी पूना र्मचट्स चेंबर
उपचार म्हणून दिवाळी
ऐन दिवाळीच्या तोंडावर केवळ डाळींचीच नाही तर सर्वच वस्तूंची फार मोठी भाववाढ झाली आहे. त्यामुळे श्रमजीवी, कष्टकरी आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशा तमाम वर्गाला दिवाळी साजरी करणे अवघड होणार आहे. या वस्तूंचे दर आवाक्यात येणार नाहीत, अशीच परिस्थिती असल्याने आता दिवाळी साजरी करणे या वर्गाच्या आवाक्याबाहेरचे आहे. अशा परिस्थितीत केवळ उपचार म्हणूनच दिवाळी साजरी होणार.
नितीन पवार, निमंत्रक, अंगमेहनती, कष्टकरी संघर्ष समिती
किरकोळ बाजारातील प्रमुख वस्तूंचे मंगळवारचे दर (प्रतिकिलोचे)
साखर- ३०, तूरडाळ- २२०, हरभरा डाळ- ६५-७०, मूगडाळ- १२०-१३०, गोटा खोबरे- १८०-२००, रवा २८-३०, मैदा- २८-३०, दाणे- ११०, गूळ- ४०, बेसन- ९०, पोहा- ३५-४०, साबुदाणा- ६०-७०, आटा- २०-२२.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Diwali clicks inflation