संगीताचा धंदा करू नका, ती साधना आहे – उस्ताद उस्मान खाँ

जगभरातून आलेल्या शिष्यांसह उपस्थितांच्या भावनांतून उलगडत जाणारे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांचे वेगळेपण.. आणि भारावलेल्या श्रोत्यांना वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी खुद्द खाँसाहबांची झंकारलेली सतार..

जगभरातून आलेल्या शिष्यांसह उपस्थितांच्या भावनांतून उलगडत जाणारे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांचे वेगळेपण.. आणि भारावलेल्या श्रोत्यांना वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी खुद्द खाँसाहबांची झंकारलेली सतार.. अशा वातावरणात उस्मान खाँ यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस शनिवारी झाला. ‘संगीताचा धंदा करू नका. ती साधना आहे,’ असा गुरूमंत्र खाँ यांनी सत्काराला उत्तर देताना दिला.
नाद परिवारातर्फे धारवाड घराण्याचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सतारवादक पंडित अरविंद पारिख यांच्या हस्ते खाँ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी नूरजहाँ खाँ, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, समीक्षक विनय हर्डीकर आदी उपस्थित होते. सत्कार समारंभानंतर उस्मान खाँ यांचे सतारवादन झाले. त्यांना उस्ताद फजल कुरेशी यांनी तबल्याची साथ केली.
‘मी साधक आहे. काहीवेळा मला परिस्थितीशी तडजोड करावी लागलीही. मात्र ते बळही मला साधनेनेच दिले. भारतीय संगीत परंपरेची मोठी ताकद आहे. त्याला जगभरात मान आहे. आपणही त्याचे पावित्र्य जपले पाहिजे,’ अशा भावना सत्काराला उत्तर देताना खाँ यांनी व्यक्त केल्या.
पारिख म्हणाले, ‘गुरू हा आधी माणूस म्हणून मोठा असावा लागतो. तरच त्याचे शिष्यांशी अतूट नाते जुळते. गुरूकडे जसे ज्ञान आवश्यक असते, तशीच शिष्य घडवण्याची आसही असावी लागते. उस्ताद उस्मान खाँ यांचे कलाकाराप्रमाणेच गुरू म्हणून असलेल्या मोठेपणाची साक्ष त्यांच्या शिष्यांबरोबर असलेल्या नात्यातून मिळते.’
हर्डीकर म्हणाले, ‘कलेचा अहंकार हा कलाकाराच्या अहंकारापेक्षा मोठा असतो आणि त्याला सामोरे जाण्यासाठी समर्पण आवश्यक असते. या समर्पण भावनेतून कला आणि कलाकार एकरूप होऊन जातात, त्यांच्यात फरक राहात नाही. याचे उदाहरण म्हणजे उस्ताद उस्मान खाँ आहेत.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Do not business of music ustad usman khan

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या