‘जलयुक्त शिवारा’त ठेकेदार नको!

जलयुक्त शिवार हा कार्यक्रम चांगला आहे परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याचे काम तितकेसे चांगले झाले नाही.

Pune : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांचे मत
‘‘जलयुक्त शिवार हा कार्यक्रम चांगला आहे परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याचे काम तितकेसे चांगले झाले नाही. या वर्षी कार्यक्रमात अनेक ठिकाणी ठेकेदार घुसले. ठेकेदार कितीही प्रामाणिक असला तरी तो
आपल्या कंपनीच्या फायद्यासाठीच काम करत असतो. ही योजना शाश्वत स्वरूपात राबवायची असेल तर ती ठेकेदार व भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवायला हवी,’’असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
प्रबोध समूहाचा अठ्ठाविसावा वर्धापनदिन आणि ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक आप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राजेंद्रसिंह यांना ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांच्या हस्ते मंगळवारी ‘भगीरथ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. संस्थेचे कार्यवाह सुभाष देशपांडे, राम डिंबळे, विवेक गिरीधारी, मोहन गुजराथी, ‘जलबिरादरी’चे सुनील जोशी या वेळी उपस्थित होते.
जलयुक्त शिवारात लोकांचा सहभाग व निर्णयप्रक्रियेत लोकांची भागीदारी असणे गरजेचे आहे, असे सांगून राजेंद्रसिंह म्हणाले,‘‘निर्णयप्रक्रियेत लोक नसतील तर त्यात भ्रष्टाचार येईल. हा भ्रष्टाचार कायद्याने रोखता येणार नाही, तर सहभागी समाजाचा सदाचारच भ्रष्टाचाराला दूर ठेवू शकेल. गतवर्षी जलयुक्त शिवारात लोकांनी आपल्या खिशातील पैसाही ओतला आणि एक हजार कोटींची कामे लोकसहभागातून झाली. या वर्षी मात्र एवढे चांगले काम झाले नाही. या वर्षी कार्यक्रमात अनेक ठिकाणी ठेकेदार घुसले. आम्ही १९ जिल्ह्य़ांमध्ये जाऊन ही कामे पाहिली आहेत. जलयुक्त शिवाराची कामे जिथे सामुदायिक भागीदारीतून सुरू आहेत, तिथे प्रकल्प चांगला चालला आहे व त्यातून मृतप्राय नद्या पुनर्जीवित व्हायच्या आशा अधिक आहेत. ठेकेदार कितीही प्रामाणिक असला तरी तो आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी काम करत असतो. जलयुक्त शिवार अशा लाभासाठी नाही. ही योजना शाश्वत व पुन्हा राबवण्यायोग्य करायची असेल त्याला ठेकेदार व भ्रष्टाचारापासून मुक्त करून तो सामुदायिक कार्यक्रम करायला हवा.’’

‘महाराष्ट्र राजस्थानच्या रस्त्याने जात आहे!’
‘‘महाराष्ट्रातील लोक देवाचे ‘लाडले बेटे’ आहेत. लाडकी मुले अनेकदा बिघडतात. गतवर्षी राज्यात ८४ टक्के पाऊस पडला तरीही राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे,’’ असे सांगून राजेंद्र सिंह म्हणाले,‘‘मराठवाडय़ात प्रचंड पाणी खर्च होईल अशी पिके घेतली जातात. मी ऊसविरोधी नाही. परंतु मराठवाडा आणि विदर्भातील पिके या वर्षी फसली. तसे होऊ नये. मराठवाडय़ात उसाऐवजी कमी पाणी लागणारी तूर येऊ शकते. मोहरी आणि हरभराही या भागासाठी चांगली पिके आहेत. हवापाण्याची परिस्थिती बदलत असताना पिकेही बदलणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्र राजस्थानच्या वाटेने जात असून जमिनी उजाड होणे रोखण्यासाठी पावसाच्या चक्राबरोबर पिकांचे चक्र बसवायला हवे. शहरातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आता बुद्धीचा दुष्काळ दूर करून पाणीवापराबद्दलची दक्षता वाढवण्याची गरज आहे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Do not involved contractor in jalyukta shivar yojana says waterman rajendra singh

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले
ताज्या बातम्या