प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत असताना अनेक अडचणी येतील. परंतु त्यांचा सामना धीरोदात्तपणे केला पाहिजे. आयुष्याच्या वाटेवर आपण जे देत जातो तेच आपल्याला मिळत जाते. त्यामुळे सकारात्मक काही होत नसेल तर खचून न जाता आपले काम करत रहा, असा सल्ला डॉ. प्रकाश आमटे यांनी रविवारी विद्यार्थ्यांना दिला.

लिफ्ट फॉर अपलिफमेंट संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांचे सामाईक प्रवेश परीक्षेचे (नीट) क्लास विनामूल्य चालवले जातात. प्रतिकूल परिस्थितीतून सरकारी उच्च वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात आमटे बोलत होते. डॉ. मंदाकिनी आमटे, शिक्षण विभागाच्या सहाय्यक उपसंचालक मीनाक्षी राऊत, संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सोनवणे, डॉ. नितीन ढेपे या वेळी उपस्थित होते. सत्कारानंतर डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्याशी किरण देशमुख व निखिल नागपाल यांनी संवाद साधला. बाबा आमटेंशी असलेले नातेसंबंध, हेमलकसाला जाण्याचे कसे ठरले, प्रकाश व मंदा आमटे पती-पत्नीमधील परस्पर समजून घेण्याची भावना अशा विविध विषयांवर डॉ. आमटे यांनी भाष्य केले.

अखंड काम करत राहिले पाहिजे असे सांगून आमटे म्हणाले, आपण सगळेच माणसांत राहतो. माणसा-माणसांचा नित्यनेमाने संपर्क, संबंध येतो. मात्र, लोकबिरादरी प्रकल्पामध्ये आमचा विविध वन्यप्राण्यांशी संबंध येतो. तेथे अनाथ वन्यप्राण्यांचा सांभाळ केला जातो.

इतक्या वर्षांच्या सहवासात आम्हा कुटुंबातील प्रत्येक जण प्राण्यांशी जवळीक साधून आहे. ते प्राणीही माझ्यासह संपूर्ण कुटुंबांवर तेवढेच प्रेम करतात. प्राण्यांना प्रेम व विश्वासाची भाषा कळते, म्हणूनच प्राणी माणसापेक्षा जास्त प्रेम करतात, असेही त्यांनी सांगितले. अतुल धाकणे यांनी प्रास्ताविक, आभारप्रदर्शन हितांशू प्रधान यांनी केले.