पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या, डॉक्टरांनी मानधनात वाढ व्हावी म्हणून आंदोलन केले. संबंधित रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर समान काम समान वेतनचा नारा देत डॉक्टरांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दोन वर्षांचा ट्रेनिंग (सीपीएस) कोर्स असून यासाठी डॉक्टरांना २४ हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता संबंधित ट्रेनी डॉक्टरांचे मानधन वाढवावे, यासाठी आज रुग्णालयासमोर डॉक्टरांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांची पगारवाढ केलेली आहे. तर मुंबई महानगर पालिकेने देखील तेथील डॉक्टरांचे मानधन वाढवले आहे. मात्र, वारंवार महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्रव्यवहार करूनही मानधन वाढवण्यात येत नसल्याने, आज संबंधित डॉक्टरांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे.