पुणे शहरातील ‘डॉग हॉस्टेल्स’मधील बुकिंग फुल

पुणे : दीड वर्षांहून अधिक काळ महासाथीचा सामना केल्यानंतर जनजीवन आता पूर्ववत होत आहे. विशेषत: पर्यटनावरील र्निबध दूर झाल्यामुळे सहलींना जाणाऱ्या प्राणी पालकांकडून आपल्या पाळीव प्राण्यांसाठी डॉग हॉस्टेल्सना पसंती दिली जात आहे. मात्र, शहरातील डॉग हॉस्टेल्सची बुकिंग फुल झाली आहेत.

२०१९ मध्ये आलेल्या करोना महामारीपासून पयर्टन बंद होते. सध्या बहुतांश निर्बंध उठल्यामुळे नागरिकांनी सहलीला जाण्याचे बेत आखले आहेत. सहलीला जाताना घरातील पाळीव प्राण्याची, विशेषत: श्वानाची हेळसांड होऊ नये म्हणून त्याच्यासाठी डॉग हॉस्टेलचा पर्याय आपलासा केला जात आहे.

 पेटसिटर्सच्या शलाका मुंदडा म्हणाल्या, दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी सहलीला जाणाऱ्यांकडून श्वानाला हॉस्टेलमध्ये ठेवण्यास पसंती दिली जाते. तसेच, पुणे शहरात स्थायिक असलेले, मात्र दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाणाऱ्यांकडूनही श्वानासाठी हॉस्टेलचा पर्याय निवडला जातो. दिवाळी सुट्टीदरम्यान माझ्याकडे ५० श्वान पालकांनी त्यांच्या श्वानासाठी हॉस्टेलची नोंदणी केली आहे. श्वानपालकांसाठी त्यांचा श्वान हा पाळीव प्राणी नव्हे तर कुटुंबातील सदस्य असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणारी व्यवस्था त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. दिवाळीच्या दरम्यान प्रामुख्याने या सेवेला मोठी मागणी असते.  टूज अ‍ॅण्ड फोर्सचे विजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, पाळीव प्राण्यांमध्ये श्वान आणि मांजरींसाठी हॉस्टेलचा पर्याय उपलब्ध असतो. आम्ही प्रामुख्याने श्वानांसाठी हॉस्टेल चालवतो. दिवाळी आणि पर्यटन हे समीकरण असल्याने या काळात श्वानाला कुठे सोडून जायचे ही अडचण असते. त्यावर उपाय म्हणून आता हॉस्टेलमध्ये ठेवण्याला प्राधान्य दिले जाते. नाताळ आणि नववर्षांनिमित्त सहलीला जाणाऱ्या श्वानपालकांकडून आता हॉस्टेलचे बुकिंग झाले आहे.

फटाक्यांपासून जपण्यासाठी हॉस्टेलला पसंती

पाळीव प्राण्यांना, विशेषत: श्वानांना दिवाळीच्या काळातील फटाक्यांचा त्रास होतो. त्यामुळे श्वानप्रेमी आणि पालक फटाके वाजवण्यापासून परावृत्त होतात, मात्र बाहेर वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांचा प्राण्यांना त्रास होतोच. त्यामुळे फटाके मोठय़ा प्रमाणात वाजवले जातात अशा दिवाळीच्या चार प्रमुख दिवसांमध्ये आपल्या श्वानांसाठी शहरापासून बाहेर, शांत ठिकाणी असलेल्या हॉस्टेलला श्वान पालक पसंती देतात, अशी माहिती पेटसिटरच्या शलाका मुंदडा यांनी दिली.