लोकसभा निवडणुका आल्या की पवार ‘साहेबांना’ पंतप्रधान करायचे आहे, अशी भाषणबाजी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होते. यंदा मात्र, या धोरणात बदल करण्यात आल्याचे दिसून येते. शरद पवार यांना ‘पंतप्रधानपदाचे उमेदवार’ म्हणू नका आणि तसा प्रचारही करू नका, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी थेरगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, तेव्हा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या साक्षीने अजितदादांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, पवार साहेब आता ७४ वर्षांचे आहेत. सहा वर्षांसाठी ते राज्यसभेवर गेले आहेत. केंद्रात एकाच पक्षाचे सरकार येणार नाही, हे पुरते स्पष्ट आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढले आहे. जयललिता, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंह यादव असे अनेक प्रादेशिक नेते लोकसभेतील संख्याबळाचा आपापल्या राज्यासाठी फायदा घेतात. देशाच्या राजकारणात साहेबांचे महत्त्व वाढले पाहिजे, त्यासाठी लोकसभेची एकेक जागा महत्त्वाची आहे. मात्र, शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असा प्रचार करू नका. यंदा राष्ट्रवादीच्या जागा निश्चितपणे वाढणार आहेत. मावळ, शिरूर व बारामती लोकसभेची जबाबदारी आपण घेतली असून त्या तीनही जागा आम्हीजिंकू, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला. काहीजण टोलचे राजकारण करतात, असा टोला मनसेला हाणला. तर, शिवसेनेने चांगल्या प्रकल्पांना खीळ घालण्याचे काम केल्याची टीका त्यांनी केली. गारपिटीवरून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्नही होत आहे, याकडे लक्ष वेधले. आम्ही म्हणू तसे १०० टक्के काम होईल, असे काँग्रेस व राष्ट्रवादीला म्हणता येणार नाही. कारण, दोन्ही पक्षांना मान्य होईल, असे निर्णय होतात, असे ते म्हणाले.