मतदार याद्यांमधील घोळाबाबत निवडणूक आयोगाने दिलगिरी व्यक्त केली असली, तरी फक्त दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही, तर याद्यांमधील घोळामुळे जे मतदार मतदानापासून वंचित राहिले त्यांना मतदानाचा हक्क दिला गेला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केली आहे.
मतदार याद्यांमधील गोंधळामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले. मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु केवळ दिलगिरीने हे प्रकरण संपणार नाही. तर निवडणूक आयोगाची दिशाभूल करणाऱ्या आणि अशा प्रकारांमागे असलेल्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन शिरोळे यांनी दिले आहे. पुण्यातही सांगलीतील एक लाखाहून अधिक मतदारांची नावे घुसवली जाणे तसेच हजारो मतदारांची नावे वगळली जाणे याबाबत आम्ही सातत्याने तक्रारी केल्या आहेत. नागरिकांनीही या प्रकाराच्या विरोधात आंदोलन केले. मात्र, प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे, असे शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे जे पुणेकर मतदार मतदानापासून वंचित राहिले त्यांना पुन्हा मतदानाचा हक्क दिला गेला पाहिजे, अशी मागणी करून पुण्याच्या यादीत हेतुपुरस्सर घोटाळे करण्यात आल्याचा आरोपही शिरोळे यांनी या निवेदनातून केला आहे.